ठाणे प्रतिनिधी-नागेश पवार दिवा: ठाणे महानगरपालिकेच्या दिवा परिसरातील शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर दिव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे कल्याण उप जिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर, आता शिंदे गटाचे नगरसेवक ॲड. आदेश भगत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडेंवर जोरदार पलटवार केला आहे.
’मुंगेरीलाल के हसीन सपने’ आणि ‘बिचकुले’ उपमा
ॲड. आदेश भगत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक उपरोधिक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर “मुंगेरीलाल के हसीन सपने” असे लिहीत मुंडे यांना स्वप्नवत जगात वावरणारा नेता असल्याचे दर्शवले आहे. केवळ फोटोच नव्हे, तर आपल्या पोस्टमध्ये अत्यंत जहाल शब्दांत भगत यांनी मुंडे यांची खिल्ली उडवली आहे.
”जनतेने लाथाडले, अनेक पक्षांनी हाकलले, दिवा शहराचे बिचकुले, खोट्या स्वप्नात अडकले”
अशा शब्दांत भगत यांनी मुंडे यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या दाव्यांवर बोचरी टीका केली आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी ॲड. रोहिदास मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती की, दिव्यातील शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांनी निवडणूक शपथपत्रात मालमत्ता आणि इतर माहिती लपवली आहे. याप्रकरणी न्यायालयात ‘इलेक्शन पिटीशन’ दाखल करण्यात आली असून हे नगरसेवक अपात्र ठरतील, असा दावा त्यांनी केला होता. या दाव्यामुळे शिंदे गोटात खळबळ माजली होती.
राजकीय संघर्षाला धार
आदेश भगत यांच्या या पोस्टमुळे दिव्यात आता ‘ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट’ असा थेट सामना रंगला आहे. मुंडे यांनी कायदेशीर लढाईचा पवित्रा घेतला असताना, भगत यांनी त्यांना “राजकीय अस्तित्व नसलेले” आणि “पक्षातून हाकललेले” असे संबोधून जनतेचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंडे यांच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, दिव्यातील या ‘सोशल मीडिया वॉर’ मुळे स्थानिक राजकारण मात्र पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
