SIT चौकशीनंतर EDचे समन्स; पदाचा वापर करत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप…
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
यानंतर नुकतीच त्यांची खरात प्रकरणी एसआयटी चौकशीही करण्यात आली. तब्बल पाच तास चाललेल्या या चौकशीत चाकणकर यांना ४५ प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकर ईडीच्या रडारवर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीकडून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले आहेत. पदाचा दुरुपयोग करत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची दोन दिवसांपूर्वी अशोक खरात प्रकरणी एसआयटीने पाच तास चौकशी केली होती. या चौकशीत रुपाली चाकणकर यांना खरातशी ओळख कधी झाली, त्याच्याशी काही आर्थिक संबंध आहेत का, व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंबाबत आधी माहिती होती का याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते. याच चौकशीत खरातच्या संस्थेतील आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधांची माहिती एसआयटीने विचारली होती. आता एसआयटीची चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आर्थिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेप केला का? याचा तपास ईडी करणार आहे. तसंच त्यांच्या पदाचा वापर करून काही व्यवहार केले गेले का याचाही तपास ईडी करणार आहे.खरातच्या शिवनिका संस्थानच्या विश्वस्त म्हणून कार्यरत असताना काही व्यवहार झाले का, संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहार, निधीचा वापर आणि संभाव्य लाभार्थ्यांच्या व्यवहारांची माहिती आता ईडी तपासत आहे.
एसआयटीने चौकशीनंतर तयार केलेला अहवाल येत्या काही दिवसात ईडीकडे सोपवला जाऊ शकतो. या अहवालात आर्थिक व्यवहारांच्या माहितीचा तपास ईडी करणार आहे. जर यात आर्थिक व्यवहारात काही अनियमितता आढळली तर ईडी कारवाई करू शकते. चाकणकर यांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरातने कथितपणे खंडणी रॅकेट चालवत बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून ७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वळवल्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यासह संपर्कातील इतरांच्याही आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. संबंधित व्यक्तींची भूमिका काय होती याचाही तपास केला जात आहे. चाकणकर यांना समन्स बजावल्याच्या प्रकरणी अद्याप ईडी किंवा इतर कुणी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र एसआयटी चौकशीनंतर ईडीच्या एन्ट्रीने चाकणकर यांचा पाय आणखी खोलात गेला असल्याचं म्हटलं जात आहे.
