मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूमध्ये अनेक धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवड्यांत राज्यभरातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात असलेली तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाद्वारे (TASMAC) चालवण्यात येणारी ७१७ दारुची दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारद्वारे तमिळनाडूभर ४ हजार ७६५ दारुची दुकाने चालवली जातात.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांनी मंदिरे, शाळा, महाविद्यालये आणि बस स्थानकांजवळ कार्यरत असलेली दुकाने ओळखण्यासाठी राज्यव्यापी पाहणी केली. सर्वेक्षणात असं आढळून आलंय की २७६ दारुची दुकाने प्रार्थनास्थळांजवळ १८६ शैक्षणिक संस्थांजवळ आणि २५५ बस स्थानकांजवळ आहेत, त्यामुळे बंद करण्यासाठी निश्चित केलेल्या दुकानांची एकूण संख्या ७१७ झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दारूच्या दुकानांवर अधिक कठोर नियमन सुनिश्चित करणे आणि संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांजवळ असलेल्या राज्य सरकारच्या दुकानांविषयीच्या सार्वजनिक चिंता दूर करणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.
निष्कर्षांच्या आधारे, मुख्यमंत्री विजय यांनी अधिकाऱ्यांना दोन आठवड्यांच्या आत सर्व ७१७ दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले. TASMAC ची दुकाने तमिळनाडू सरकारसाठी महसुलाचा प्रमुख स्रोत राहिली आहेत, तरीही गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांकडून अनेक दारूची दुकाने बंद करण्याची मागणी केली जात आहे.
या महामंडळाला अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीलाही सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ‘तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’ आणि संबंधित संस्थांशी संबंधित कथित गुन्ह्यांच्या तपासाचा भाग म्हणून या संस्थेने तमिळनाडूतील अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. तर, जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघमनेही आपल्या जाहीरनाम्यात अंमली पदार्थमुक्त तमिळनाडूसाठी काम करण्याचे वचन दिले होते.
जोसेफ विजय यांनी याआधी कोणते तीन निर्णय घेतले होते?
२०० युनिट मोफत वीज: तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अंमली पदार्थ विरोधी ‘स्पेशल टास्क फोर्स’: राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी एका विशेष कृती दलाचीस्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ‘ड्रग-फ्री तमिळनाडू’ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
महिला सुरक्षेसाठी विशेष दल: राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणखी एक स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी हे दल काम करेल. मी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करेन असंही विजय यांनी जाहीर केलं आहे. ज्यानंतर त्यांनी हे धडाकेबाज निर्णय जाहीर केले आहेत.
