प्रतिनिधी, विकी जाधव
बीड : मौजे बीड पिंगळे येथील सर्व्हे नं. 188 मधील कथित बेकायदेशीर फेरफार प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंजूर विकास आराखड्यात प्ले ग्राउंड व म्हाडाचे आरक्षण असतानाही कथितपणे बोगस गुंठेवारी दाखवून अनधिकृत भूखंड तयार करून व्यवहार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अनिता वानखडे यांनी केला आहे.
या प्रकरणातील संबंधित फेरफार आदेश तात्काळ रद्द करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता व्यवहार झाल्याचा आरोप करत हे प्रकरण कायद्याच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच पुढील कोणतीही खरेदी-विक्री व नोंदणी प्रक्रिया थांबविण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
“फेरफार थांबला पाहिजे आणि प्ले ग्राउंड व म्हाडाचे रिझर्व्हेशन वाचले पाहिजे,” अशी भूमिका अनिता वानखडे यांनी मांडली असून नागरिकांनीही या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

