
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी आधार देणारे, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागिरदार घाटगे घराण्यात झाला, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते,
शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते, ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाईंनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले,
शाहू महाराजांना शिक्षणासाठी राजकोट व धारवाड येथे पाठविण्यात आले, तेथील शिक्षण त्यांनी पूर्ण केले,तेथेच त्यांना सर एस, एम फ्रेजर व रघुनाथराव सबनीस यांच्या सारखे महान गुरू लाभले, त्यांच्या कडून इतिहास, इंग्रजी, या विषयाचे शिक्षण घेतले,
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह १ एप्रिल १८९१ रोजी लक्ष्मीबाई सोबत झाला, त्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी २ एप्रिल १८९४ रोजी राज्यभिषेक करून घेतला, तेव्हा पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली,
भारतात प्रथमच सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणि वस्तिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरुष होते, जातिभेद हा भारताला लागलेला कलंक आहे,हे ओळखुन अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले,म्हणूनच त्यांना ‘बहुजनाचे उध्दारक ‘असेही म्हणतात,
बहुजन समाजातील लोकांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत हे जाणून प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर देण्यात आला,८ सप्टेंबर १९१७ रोजी प्रत्येक खेड्यात शाळा सुरू केली, जे पालक मुला- मुलींना शाळेत पाठविणार नाहीत, त्यांना दंड करण्यासाठी तरतूद करण्यात आली ,
उच्च शिक्षण घेण्यासाठी खेड्यातील मुलांना कोल्हापूर येथे आणले व तेथे सर्व जाती -जमातीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वस्तीगृहात ठेवले ,मराठा विद्यार्थ्यांसाठी ”व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग” स्थापना केली होती,
१९०२ मध्ये शाहू महाराजांनी राज्यातील सरकारी नोकर-यात मागासवर्गीयांना पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांच्यावर भरपूर टीका करण्यात आली ,तरीही शेवट पर्यंत आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले, अस्पृश्य विद्यार्थाच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापूरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग” या नावाने वस्तिगृह उघडले त्यामुळे सर्वत्र शिक्षणाची गंगा पोहचवली ,म्हणूनच त्यांना ‘आरक्षणाचे जनक ‘म्हटले जाते,
कोल्हापूर पासून ५५ कि,मी,अंतरावर असलेल्या दाजीपूर जवळ भोगावती नदीवर बंधारा बांधून त्या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात आला, त्या बंधा-याला “महाराणी लक्ष्मीबाई तलाव” असे नाव देण्यात आले आहे, तसेच १९०९ मध्ये शाहू महाराजांनी राधानगरी प्रकल्प हाती घेतला, या कामी त्यांना भास्कर राव जाधव, अण्णासाहेब लट्टे, केशवराव विचारे यांच्या माध्यमातून सहकार चळवळीचा मूलमंत्र प्रत्येक शेताच्या बांधावर पोहोचवला, त्यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला,यातून खेड्याची प्रगती होईल,खेडयातील लोक खेड्यातच थांबतील,त्यामुळे मोठ्या शहराचा समतोल बिघडणार नाही, हे तेव्हा ओळखले होते हे विचार ,कृषी क्षेत्रात संस्थानाचा कायापालट करणारे ठरले, म्हणूनच त्यांना रयतेचे राजे असे म्हणतात,
शाहू महाराजांनी संस्थानातील महार वतने रद्द करण्यात आले, व रामोशी जातीच्या लोकांना रोज पाटलाकडे वर्दी द्यावी लागत असे,ती बंद केली,तेथील जमिनी अस्पृश्यांच्या नावावर रयतवारी पध्दतीने करून देण्यात आल्या, वेठबिगारी व गुलामगिरी कायदयाने कायमस्वरूपी बंद करून टाकण्यात आली, त्यामुळे त्यांना वंचिताचे राजे असेही म्हणतात,
वतनदाराच्या जाचाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी खेड्यातील कुलकर्णी वतने रद्द करून त्या जागी तलाठी नेमणूक करण्याची नवीन पध्दत सुरू केली, त्यामुळे सर्व सामान्य लोकांना फायदा झाला, जसे लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात त्याच प्रमाणे संस्थानातील लोक महाराजाकडे धाव घेत असत, म्हणूनच त्यांना पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते असेही म्हणतात,
८ मे १८८८ रोजी “कोल्हापूर ते मिरज” या रेल्वे मार्गाची पायाभरणी शाहू महाराजानी केली, त्यामुळे आज औद्योगिक क्षेत्रासाठी किती तरी फायदा होताना दिसत आहे, १८९५ मध्ये कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ सुरू केली,
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये, म्हणून नेहमी लक्ष देऊन तो थांबविण्यात आला, अस्पृश्याना सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच शाळा, धर्मशाळा, विहिरी, दवाखाने, पाणवठे येथे समानतेने वागवावे,असे आदेश त्यांनी काढले, त्यामुळे सर्वाना राजा आपलाच आहे असे वाटू लागले होते, १९२० मध्ये शाहू महाराजांनी नागपूर व माणगाव येथे त्यांनी अस्पृश्यांची परिषद भरविली, त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांच्या मुक्ती चळवळीचे नेतृत्व करण्यास प्रोत्साहन दिले,त्यामुळेच त्यांना सामाजिक न्यायाचे शिल्पकार म्हणतात.
रोम येथील आखाडयाच्या धर्तीवर कोल्हापूरात कुस्तीचे मैदान बांधले, त्यामुळे कोल्हापूर ही मल्लविद्येची पंढरी बनली, लोकजीवनाला नाटक,
संगीत,लोककला, चित्रकला चित्रपट आणि खेळ या कलाची जोड दिली, अल्लादिया सारखे गानमहर्षी व बाबूराव पेंढारकर सारखे चित्रमहर्षी कोल्हापूरात होते त्यासाठी त्यांना कलाश्रयी राजा असे ही म्हणतातआणि तेथेच साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला,हा खेळ चपळाईने व साहसाने खेळावा लागतो, ‘शिकार हा त्यांचा आवडता छंद होता,’
शाहू महाराजांनी आपल्या सोबत मोटारीचा चालक, हत्ती वरील माहुत , तसेच चाबुकस्वार हे मागासवर्गीयच असतील अशी व्यवस्था केली होती, आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाजा बद्दल शाहू महाराजांना कळवळा होता, म्हणून कामगार व शेतमजूर ,शेतकरी, भूदास यांना संघटित रहा,असा नेहमी सल्ला देत असत, “गवताच्या काडीला महत्त्व नाही, पण पेंढीला आहे,असे पटवून सांगत असत,दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व कल्याणकारी कार्याला महत्त्व आहे, असा उपदेश केल्याने लोक शाहू महाराजाकडे आपोआप आकर्षित होत असत,
१९१९ मध्ये शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथील कृमी क्षत्रिय समितीने त्यांना “राजर्षी” पदवी बहाल केली,
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड