
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड:औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गोळेगावजवळ धावत्या कारला अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली. यात अंदाजे दहा ते अकरा लाखांचे नुकसान झाले. सिल्लोड येथील वैद्यकीय अधिकारी मोसीन खान हे अमीन पठाण (सिल्लोड) यांच्यासह आपल्या कार (क्र. एमएच. २०, एफवाय. ५०९९) ने अजिंठा येथून सिल्लोडच्या दिशेने चालले होते. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ते गोळेगाव नजीक आल्यानंतर अचानक त्यांच्या धावत्या कारला आग लागली. ही बाब चालक मोसीन खान यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या बाजुला लावून दोघेही गाडीतून उतरले. आग विझविण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला, मात्र तोपर्यंत कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. गाडीला आग नेमकी कशामुळे लागली? याचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सपोनि. अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. बाबा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.