
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
जिल्हा माहिती कार्यालयात शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कार्यक्रम
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, वैद्यकीय सुविधा, जल सिंचन, वृक्षाच्छादनात वाढ, शेतीला प्रोत्साहन यांसह सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी आयुष्यभर अतुलनीय असे कार्य केले. छत्रपती शाहू महाराजांचे विचार कायम आत्मसात करून प्रत्येकाने प्रगती साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. कैलास अंभुरे यांनी केले.
विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ‘छत्रपती शाहू महाराजांचे विचार’ या विषयावर डॉ.अंभुरे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माहिती अधिकारी मीरा ढास, माहिती सहायक श्याम टरके, संजिवनी जाधवआदींची उपस्थिती होती.
डॉ. अंभुरे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात सामान्यांचा विकास करण्यावर कृतीतून भर दिला. या लोकराजाच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर कृतज्ञता पर्व साजरे करण्यात आले, ही बाब महत्त्वपूर्ण आहे. अस्पृश्यता निवारण, जलसिंचनाचा विचार, वृक्षाच्छादनावर भर, ‘रबर, कॉफी, चहा, खैर’च्या लागवडीला प्रोत्साहन छत्रपती शाहू महाराजांनी दिले. वंचितांना न्याय देण्याचे काम लोकराजा शाहू महाराजांनी करत सामान्यांच्या –हदयात त्यांनी स्थान मिळवले. तत्काळात साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर दिला असल्याचेही अंभुरे म्हणाले.
सुरूवातीला श्री.चिलवंत यांनी श्री. अंभुरे यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन श्याम टरके यांनी केले. आभार मीरा ढास यांनी मानले.