
दोन वर्षांच्या नातवासह आजीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः उतरले पाण्यात !
राज्यभरात पावसाने हाहा:कार माजवला आहे. अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढलं आहे. याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे.
अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये एका चिमुकल्यासह आजीला पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी स्वतः उतरले. त्यांचे हे कृत्य पाहता सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात असलेल्या वडनेरमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवली आहे. एकाच कुटुंबातील एक आजी आणि दोन वर्षांचा नातू आणि इतर दो कुटुंबातील सदस्य पुराच्या पाण्यात अडकले. घराला पाण्याने वेढा दिल्याने चौघेही रविवारी मध्यरात्रीपासून घरच्या छतावर जाऊन बसले होते.
कुटुंबातील चारही व्यक्ती रविवारी मध्यरात्री २ वाजेपासून छतावर बसून होते. त्यांना ना अन्न मिळाले ना पाणी. मदतीच्या प्रतिक्षेत आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या चौघांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले.
पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग आणि पावसातच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या पथकाबरोबरच खासदार ओमराजे निंबाळकरही पाण्यात उतरले आणि कुटुंबातील चौघांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
‘एनडीआरएफच्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप पणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले. या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन’, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.