ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ,विकी जाधव
बदलापूर: बदलापूर परिसरातील उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी (Water Hyacinth) पसरल्याने तसेच सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याच्या आरोपांमुळे परिसरातील नागरिक व नदीकाठच्या गावकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. या गंभीर पर्यावरणीय प्रश्नाबाबत पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांनी कुळगाव–बदलापूर नगरपरिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील सांडपाणी उल्हास नदीत सोडले जात असल्यामुळे नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली असून नदीतील जलजीव तसेच परिसरातील जनावरांच्या जीवनावर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. नदीकाठच्या काही गावांमध्ये या पाण्याचा विविध कामांसाठी वापर केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) मंजूर असला तरी तो अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र संबंधित विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांडपाणी STP द्वारे प्रक्रिया करून सोडले जात असल्याचा अहवाल दिल्याची बाबही चर्चेत आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांनी जिल्हाधिकारी ठाणे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार सादर करून उल्हास नदीतील प्रदूषणाची तात्काळ तपासणी करावी, नदीच्या पाण्याचे नमुने तपासावेत आणि जर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, उल्हास नदी परिसरातील पर्यावरण व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

