
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सुर्य आग ओकतोय तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे तर दुसरीकडे लोहा तालुक्यातील उन्हाळी पिकांना लिंबोटी धरणाचे पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांचे पिके करपू लागले असुन याकडे जिल्हाधिकाऱ्यांने तात्काळ लक्ष देऊन लिंबोटी धरणाच्या पाण्याची पाचवी पाळी तात्काळ सोडावी अशी मागणी शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी केली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना शेतकरी मित्र साहेबराव काळे म्हणाले की, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून ओळखले जाणारे लिंबोटी धरण असुन या लिंबोटी धरणामुळे लोहा तालुक्यातील हजारों हेक्टर सिंचनासाठी आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असल्याने लिंबोटी धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा आहे. त्यामुळे लिंबोटी धरणाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भूईमुग,ऊस आदी पिकांची लागवड केली आहे. याअगोदर यंदाचा हंगामात लिंबोटी धरणांचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी चार वेळेस सोडले होते.पण आता पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडला आहे हातातोंडाशी आलेला घास पाण्या अभावी निघून जातो की काय अशी चिंता लागली आहे तसेच गुरा ढोरांना ही पिण्यासाठी पाणी नाही तसेच चारा ही नाही.
तेव्हा यांकडे सर्व विभागांचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन लिंबोटी धरणाच्या पाण्याची पाचवी पाळी तात्काळ सोडावी व शेतकऱ्यांचे पाण्या अभावी करपू लागलेले पिक वाचवावे व लिंबोटी धरणाचे पाणी लाभ क्षेत्रात तात्काळ सोडावे अशी मागणी शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी केली आहे.