
दैनिक चालू वार्ता पंढरपूर प्रतिनिधी- सुधीर आंद
पंढरपूर– येथील कर्मवीर भाऊराव पाटील (स्वायत्त) महाविद्यालयात “भारतातील पर्यटनाच्या समस्या व संभावना” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. पर्यटन व्यवसायासाठी संशोधनाची जोड आवश्यक असून त्यासोबत स्थानिक पातळीवरील पर्यटन स्थळांचा शोध घेऊन, त्यांची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणे, जाहिरात करणे व पर्यटन विकासासाठी आवश्यक बाबींचा शोध घेऊन त्यांचा विकास केल्यास पर्यटन क्षेत्राचा विकास होतो, असे प्रतिपादन मा. सॅलिस्बरी विद्यापीठ यु. एस. ए. येथील प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी सर, यांनी आपल्या बीजभाषणातून प्रतिपादन केले. तसेच,या परिषदेमध्ये नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठातील मा. प्रा. डॉ. केदार रिजाल यांनी सुद्धा नेपाळ आणि भारत या दोन देशांमधील पर्यटन व्यवसायाच्या विकासासंबंधी विविध वीस मुद्द्यांची चर्चा केली. त्यामुळे दोन्ही देशातील पर्यटनांचा विकास होईल, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे मा. प्रा. डॉ. डी. जे. साळुंखे यांनी पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे कौशल्य अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे की, ज्यातून पर्यटन व्यवसायाचा विकास होतो आणि रोजगार सुद्धा प्राप्त होऊ शकतो, असे उदाहरणासह मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे अधिष्ठाता उपप्राचार्य व भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. तानाजी लोखंडे सर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शास्त्र विभागाचे उपप्राचार्य व अधिष्ठाता प्रा. डॉ. सौ. लतिका बागल, वाणिज्य विभागाचे उप प्राचार्य व अधिष्ठाता प्रा. डॉ. बजरंग शितोळे आणि स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. मधुकर जडल, महाविद्यालय आय.क्यू.ए.सी. समन्वयक मा.प्रा.डॉ. अमर कांबळे, महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयातून सहभागी झालेले प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. भगवान नाईकनवरे यांनी व्यक्त केले तर, सूत्रसंचालन प्रा. डॉ. विलास लिंगडे यांनी केले.
तसेच, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साधक व्यक्ती म्हणून, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील भूगोल विभागप्रमुख व भूगोल अभ्यास मंडळ प्रमुख, मा. प्रा. डॉ. संभाजी शिंदे सर, यांनी “भारतातील पर्यटनाच्या समस्या व संभावना” विषयावर आपले विचार व्यक्त केले. पर्यटन हे भारतातील मोठे क्षेत्र असून तेथे अधिक रोजगार निर्मिती संधी आहे. हा पर्यटन उद्योग 2025 वर्षापर्यंत सुमारे 46 दशलक्ष रोजगार निर्माण करेल, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या स्वदेशी दर्शन योजना व प्रसाद योजना या योजनांची सविस्तर माहिती दिली. या योजनेद्वारे भारतातील पर्यटन स्थळातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. तसेच Covid-19 चा भारत आणि जगातील पर्यटन क्षेत्रावर झालेला परिणाम, भारताच्या पर्यटनात सरकारची भूमिका आणि भारतातील पर्यटन क्षेत्रातील प्रमुख आव्हाने याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
तसेच, सी.बी. खेडगीज कॉलेज, अक्कलकोट येथील भूगोल विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. शिवराया अडवीतोट सर यांनी साधक व्यक्ती म्हणून “बहुआयामी भारताचे भौगोलिक-सांस्कृतिक पैलू आणि पर्यटन विकासात त्याची भूमिका” या विषयावर आपले विचार मांडले. पर्यटनात भौतिक आणि मानवी पर्यावरण हे भौगोलिक पैलू महत्त्वपूर्ण आहेत. प्रादेशिक पर्यटनस्थळे आणि पर्यटक यांचा जवळचा सहसंबंध आहे. भूगोल हे जगाच्या हवाई भिंतीचे भिन्नतेचे विज्ञान आहे. तसेच, मानवी सभ्यतेचा विकास, भौगोलिक-राजकीय पैलू, भारतवर्षे व आर्यवर्त, अखंडभारत, सांस्कृतिक भारत, सांस्कृतिक भूदृश्य, भारतातील संगीत आणि नृत्य प्रकार, जागतिकीकरण, स्थलांतर इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. चंद्रकांत काळे सर यांनी महाविद्यालय रुसा-समन्वयक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. भारत सुळे, प्रा. डॉ. प्रविण उघडे, प्रा.उत्तम माळी, प्रा. औदुंबर कुसुमडे, प्रा.धनंजय कदम, प्रा.हर्षलकुमार घळके, प्रा.सचिन सोनकांबळे यांनीही मदत केली.