
आता ट्रम्प कोणत्या तोंडानं भारतावर टॅरिफ लावणार ?
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्धच सुरूच आहे, या युद्धामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा म्हणून रशियावर अमेरिकेकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याचा एक भाग म्हणून नाटो (NATO) देशांनी रशियाकडून तेल आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भारत आणि चीन सारखे मोठे देश रशियाकडून तेलाची खरेदी करतात, ही खरेदी थांबवावी म्हणून देखील अमेरिकेकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.
मात्र गंमत म्हणजे एकीकडे डोनाल्ड ट्रम्प हे रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये म्हणून इतर देशांवर दबाव आणत असतानाच दुसरीकडे नाटोचा सदस्य असलेला हंगेरी अजूनही आपल्या एकूण गरजेपैकी तब्बल 80 टक्के कच्च्या तेलाची खरेदी ही रशियाकडून करत आहे. तर दुसरीकडे भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर टॅरिफ लावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टरी ऑर्बान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करणं गरजेचं आहे. जर आम्ही रशियाकडून तेलाची खरेदी बंद केली तर आमची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोसळेल असं हंगेरीच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी ऊर्जेसाठी हंगेरी रशियावर 61 टक्के अवलंबून होता, मात्र युद्ध सुरू झाल्यानतंर आता हंगेरी रशियाकडून एकूण गरजेपैकी तब्बल 86 टक्के कच्च्या तेलाची खरेदी करतो.
अमेरिकेचा भारतावर दबाव
दरम्यान दुसरीकडे भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून रशियाला युक्रेन युद्धासाठी फंडिंग मिळत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. हे फंडिग थांबवण्यासाठी भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण त्यांच्यावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.