
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -संघरक्षित गायकवाड
राज्यात गुटखाबंदी असताना मुखेड हे अवैध गुटख्याचे केंद्र बनले असून, मुक्रमाबाद , बा-हाळी येथून चक्क मुखेड तालुक्यासह लगतच्या सहा तालुक्यांना राजरोसपणे गुटख्याची होम डिलिव्हरी होत आहे. पोलीस प्रशासन मात्र गुटखामाफियांना पाठीशी घालण्याचे धोरण राबवित आहे. कर्नाटक राज्यात मात्र गुटखाबंदी नाही. बाराहाळी ही बाजारपेठ कर्नाटक सीमेपासून केवळ २२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातून गुटखा खरेदी करून बाराहाळी येथे तो आणून विक्री करणे हे केवळ काही मिनिटात शक्य होत आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत बाराहाळी व परिसरातील काही खेड्यांत ही अवैधगुटखा विक्री चालू होती आणि यातून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होत असल्याने अनेकांच्या या धंद्याकडे नजरा वळल्या. प्रशासनाचा ‘भाव’ ठरलेला आहे. त्यांच्याकडूनही कुठलाच धोका नसल्याने माफियांनी गुटखा साठवणूक सुरू केली. मुखेड तालुक्यासह देगलूर, कंधार, लोहा, बिलोली व लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांना बाराहाळी येथूनच गुटखा जातो.
बाराहाळी येथे येणाऱ्या वाहनासाठी जो रस्ता आहे तो रस्ता मुक्रामाबाद पोलीस स्टेशनच्या गेटसमोरूनच जातो. त्यामुळे येणारी वाहने ही लपून छपून न येता ती पोलीस प्रशासनाच्या उघडपणे देखरेखीखालीच महाराष्ट्र राज्यात पास होतात, हे उघड सत्य आहे. माफियांचा राबता इतका वाढला आहे की, पोलीस प्रशासनाच्या कुठल्याही कारवाईमध्ये गुटखा माफियांचा एक तरी व्यक्ती मध्यस्थांच्या भूमिकेत असतो. आंतरराज्य पोलिसांकडे तक्रार केल्यास लगेच पोलीस प्रशासनातील कर्मचारीच विशेष म्हणजे कर्नाटक राज्यातून माफियांना संबंधितांचे नाव सांगत असल्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत. बाराहाळी बाजारपेठेत व परिसरात दुचाकीवर दुकानदाराला, पानपट्टीवाल्यांना गुटखा पुरवठा केला जातो. दोन वर्षांपूर्वी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या शांतता बैठकीचा संपूर्ण खर्च एक गुटखा विक्रेत्याने केल्याचे सर्वज्ञात आहे. चालणाऱ्या गुटखा रॅकेटमध्ये उच्चपदस्थ अधिकान्यांसह अनेक बड़े मासे असल्याचे चर्चेत आहे.