
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश नामदेव माने
:
जालना जळगाव रेल्वे लाईन सर्वे विमान
जालना, दि. 13 – रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा “फायनल लोकेशन सर्व्हे” केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी 8 फेब्रुवारी 2022 रोजी मंजूर केला होता. जालना ते जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या सोयीसाठी जालना- जळगाव 174 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. त्याच्या सर्वेचे काम (भौतिकदृष्ट्या) फिजीकली सुरुच आहे. त्यासोबतच आता हवाई सर्वेसाठी अकोला येथे आज विमान दाखल झाले असून या विमानाद्वारे रडार (लिडार) चा वापर करून हवाई सर्वे केला जाणार आहे. (
तहे विमान एका दिवसाला 50 किलोमीटरचा सर्वे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्व्हेला गती मिळेल. असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले. 14 ते 17 मे या चार दिवसांत हे हवाई सर्वेक्षण होणार आहे.
जालन्याचे खासदार व केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये सर्व्हेसाठी मंजुर करून घेतले आहेत. फायनल लोकेशन सर्व्हे झाल्यानंतर हा स्वीकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल. जालना जळगाव रेल्वेमुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघूउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
जालना वरून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा 70% मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे. याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थान च्या गाड्यांना आंध्राप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे. लवकरात लवकर याचे काम पूर्ण होणार आहे.
अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. अनेक वर्षांपासून या भागातील जनतेची ही आग्रही मागणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याने उशिरा स्वातंत्र्य मिळवलेल्या मराठवाड्याच्या या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हा रेल्वे मार्ग झाल्याने होणार असल्याचे दानवे यांनी मागे सर्व्हेला मान्यता देताना म्हटले होते.