
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी- श्रीकांत नाथे
अमरावती :- तांडा वस्त्यांमध्ये घरकुलांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत तसेच प्रत्येक गरजू व्यक्तीला घरकुल मिळवून द्यावे,असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने आज दिले.
अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन समितीने शाळा- वसतिगृहांची तपासणी केली,तसेच तांडा वस्त्यांनाही भेट दिली.समितीप्रमुख आमदार शांताराम मोरे यांच्यासह आमदार बळवंतराव वानखडे,सुरेश भोळे,संजय दौंड,नितीन देशमुख,अवर सचिव मंगेश पिसाळ,समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे,सहायक आयुक्त माया केदार आदी उपस्थित होते.समितीने आज चांदूरबाजार तालुक्यातील बोराळा येथे भेट दिली.यावेळी त्यांनी सिमेंट रस्त्याची पाहणी व तपासणी केली तसेच अहिल्यादेवी होळकर आश्रमशाळेतील विविध व्यवस्थेची पाहणी केली.शाळेत स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याचे निर्देश समितीने दिले.
शिरजगाव बंड येथील तांडा वस्तीची पाहणी केली.तांडा वस्तीतील ५४ लाभार्थ्यांसाठी घरकुले मंजूर आहेत.ही कामे गुणवत्तापूर्ण असावीत व प्रत्येक गरजूला घर मिळवून द्यावे असे निर्देश समितीने दिले.घाटलाडकी येथील तांडा वस्तीची पाहणीही समितीने केली.यावेळी त्यांना स्थानिक बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.चांदूर बाजार पंचायत समिती येथे समितीने बैठक घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला.समितीने अचलपूर तालुक्यातही भेट दिली.नागरवाडी येथील शाळेची तपासणी समितीने केली.