
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई,- राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे तर दुसरीकडे, शिवसेनेकडून संजय राऊत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची तारीख ठरली आहे.
शिवसेनेकडून सलग चार वेळा राज्यसभेची खासदारकी पटकवण्याचा रेकॉर्ड राऊतांच्या नावावर जमा झाला आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असलेले संजय राऊत यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. संजय राऊत येत्या २६ मे रोजी विधानभवनात जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. शिवसेना नेते म्हणून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर जाणार आहे.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. सत्ता स्थापन करण्याच्या नाट्यात संजय राऊत यांनी भाजपला अंगावर घेतले होते.शिवसेनेची रोखठोक भूमिका मांडून राऊत यांनी भाजपच्या नाकीनऊ आणले होते. याचेच बक्षीस म्हणून राऊत यांच्या गळयात पुन्हा एकदा राज्यसभेच्या खासदाराची माळ पडली आहे.