
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
ठाणे –भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०२ वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायकचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी मुंबईत प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. त्या भूमिकेतूनचं बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली. मूकनायकाच्या याच धरतीवर कल्याण तालुक्यात मूकनायक ते प्रबुद्ध भारत टीम द्वारा आंबेडकरी पत्रकारितेचा वैचारिक जागर पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे घालण्यात आला. हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमा समयी विचारमंच्यावर प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून पत्रकार सुजात प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले तर प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत , फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे , विद्रोही कवी अनिल शिंदे , कवी जीवन संघर्षकार फेम नवनाथ रणखांबे, कवी संविधान गांगुर्डे मान्यवर उपस्थित होते . कवींनी काव्य वाचन कविता – गजल सादर करून उपस्थितांची मने जिंकली . यावेळी शाहीर मेघानंद जाधव यांच्या वादळवारा कार्यक्रमाचा कल्याण नगरीत रसिकजनांनी आनंद लुटला. तसेच चित्रकार किर्तीराज, पूजा कदम आणि सुनील अवचार यांच्या कलाकृतींनाही प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश उबाळे यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहल सोहनी यांनी केले आणि आभार रोहित डोळस यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील जवळगेकर, हर्षद बोले, आदित्य कांबळे, तुषार माळवी, यांनी अथक परिश्रम घेतले .