
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : मागच्या आठवड्यात गाजलेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणामध्ये आता आणखी पाच लोकांचे मूत्रपिंड काढल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील नामांकित रुबी हॉल क्लिनीकसह आणखी एक रुग्णालय पोलिसांच्या रडार वर आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास चालू आहे. विशेषता पुण्यातील मूत्रपिंड प्रत्यारोपण गैरव्यवहाराचे धागेदोरे परराज्यात जोडले गेले आहेत. त्यादृष्टीने ठाण्यासह तामिळनाडूमधील कोईमतूर येथील हाॅस्पीटल मधील झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची पोलीस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी अभिजीत शशिकांत गाणे (४०) रा. रजपूत वीटभट्टी, एरंडवणा पुणे, रविंद्र महादेव रोडगे (४३) रा. लांडेवाडी भोसरी या दोन एजंटाना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. ह्या मध्ये आणखीही काही लोकांचा सहभाग आहे असे या दोन आरोपींनी पोलिसांना सांगितले. ह्यामुळे या किडनी तस्करीचे फार मोठे रॅकेट असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडतात याबद्दल सर्वत्र सखेद आश्चर्य वाटायला लागले आहे