दैनिक चालू वार्ता जळकोट तालुका प्रतिनिधी-हानमंत गित्ते
लग्नानिमित्त जळकोट मधील लाळी खुर्द येथे आलेल्या दोन सख्ख्या भावांसह आणखी एकाचा तिरु नदीच्या बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Death ) झाल्याची घटना घडली आहे. जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे ही घटना घडली आहे.
लातुरच्या तिरु नदीच्या बंधाऱ्यात तिघांचा बुडून दुर्दैवी मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने लाळी खुर्द गावात एकच खळबळ माजली आहे. बुडून मृत्यू झाल्याने तीन मुलांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या मृतामध्ये दोन सख्खे भाऊ देखील आहेत. चिमा बंडू तेलंगे आणि संगमेश्वर बंडू तेलंगे असे दोन भावांची नावे आहेत. तर दुसऱ्या पाहुण्याचे नाव एकनाथ हणमंत तेलंगे हे आहे. या घटनेने तेलंगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातुरच्या जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द गावात लग्नासाठी अनेक मंडळी आले होते. गावात लग्न असल्याने पाहुण्यांसहित सर्वांची लगबग सुरू होती. गावातील तुळशीराम राम तेलंगे यांच्या मुलीचा आज विवाह होता. या लग्नानिमित्त आलेल्या त्यांच्या नातेवाईकांची तयारी सुरू होती. त्याच दरम्यान, त्यांच्या पाहुण्यांची तीन मुलं तिरू नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यात अंघोळीसाठी गेले. मात्र, या बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही मुलांचा तोल जाऊन बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेत चिमा बंडू तेलंगे आणि संगमेश्वर बंडू तेलंगे या दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे दोघे भाऊ चिमेगावातील रहिवाशी होते. तर दापका राजा येथे राहणारे एकनाथ तेलंगे याही मुलाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या दु:खद घटनेनंतर विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले आहे.


