
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त जन जागृतीपर कार्यक्रम साजरा करण्यात आला.तसेच तंबाखू मुक्तीबाबत शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीकांत महल्ले होते.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.साळुंके,समिती अध्यक्ष डॉ.सविता पाटणकर,वुमन डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ.आशा हरवानी,सचिव डॉ.सानिष्ठा बेले,सहसचिव डॉ.नीरज मुरके,डॉ सुजित डांगोरे,डॉ.गिरीश तापडिया,दंतरोग तज्ज्ञ डॉ.आतिश पवार,जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. मंगेश गुजर,दंतरोग तज्ज्ञ डॉ.प्रितीश पाडगावकर,अधिसेविका श्रीमती अडळकर,आहार तज्ञ श्रीमती देशमुख,निवृत्ती इंदुरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या वर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे घोष वाक्य “तंबाखूमुळे आपल्या पर्यावरणाला धोका” हे होते.तंबाखू उत्पादनात होणारा अतिरिक्त रासायनिक खताचा वापर,यामुळे जमिनीचा कस कमी होतो व कालांतराने जमीन नापीक बनते.
राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण २०१९-२० नुसार,अमरावती जिल्हयामध्ये १५ वर्षावरील महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ९ टक्के तर १५ वर्षावरील पुरुषांमध्ये ४०.८ टक्के एवढे होते.टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्वेक्षणनुसार,९० टक्के लोकांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे कारण तंबाखू सेवन हे आहे.भारतात दरवर्षी १३.५० लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो.
तीनशे सिगारेट बनविण्यासाठी एका झाडाची तोड करावी लागते.त्यामुळे जंगलतोडीचे प्रमाण वाढले आहे.तंबाखूवर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यावधी लीटर पाण्याचा उपयोग करावा लागतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार,आजतागायत ८.४० कोटी टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जित केला गेला आहे. तसेच इतर कचरा जसे तंबाखू,गुटखा,खर्ऱ्याची पाकिटे,सिगारेट बड्स यांचे वर्षानुवर्षे विघटन होत नाही.त्यामुळे पाणी व जमीन प्रदूषित होते.तसेच तंबाखू,खर्रा,गुटखा खाणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते वारंवार आजारीही पडतात.
तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशनाकरिता जिल्हा सामन्य रुग्णालय येथे तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र चालविल्या जाते.तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावरही समुपदेशन केंद्रे चालवली जातात.कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रक कार्यक्रमाचे जिल्हा समुपदेशक उध्दव जुकरे तर आभार जिल्हा सामजिक कार्यकर्ता पवन दारोकर यांनी मानले.