
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
सातपुडा: कुंडल येथे पार पडली तीन राज्यांची आदिवासी महापंचायत
प्रकृतीपूजक आदिवासी बांधव प्रकृतीचे केवळ पूजनच करत नाही, तर वर्षानुवर्षे तिचे जतनही करीत आला आहे. नैसर्गिक साधनांचा उपभोग घेणारा परंतु निसर्गाला किंचीतही धोका न पोहोचणारा आदिवासी जल-जंगलाच्या सानिध्यातच आपले जीवनगाणे गात आला. निसर्गाशी एकरूप झालेल्या या समाजाने घरांची बांधणी, वाद्ये व भांडीही पर्यावरणपूरकच निर्माण केली. म्हणून या जीवनशैलीत (संस्कृतीत) निसर्ग वाचविण्याची ताकद आहे असा सूर कुंडल (ता.धडगाव) येथे पार पडलेल्या दुसऱ्या सातपुडा आदिवासी महापंचायतीत उमटला.
तीन राज्यातील आदिवासींच्या साक्षीने खड्या कोंडलच्या पवित्र भूमीत महापंचायत पार पडली. या पंचायतीत आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोकभाई चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सचिव डोंगरभाऊ बागुल, आदिवासी विचारवंत तथा चळवळकर्ते सांगल्याभाई वळवी, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनावणे, राजू पांढरा(पालघर), व्याराचे माजी खासदार अमरसिंगभाई चौधरी, लालसिंगभाई गामीत, गुजरातचे साहित्यिक डॉ. जितेंद्र वसावा, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमाताई वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त शिवलाल वळवी, गटनेते सी. के. पाडवी, आदिवासी एकता परिषदिचे राज्य सचिव डॉ. सुनिल पऱ्हाड (पालघर), वेणीलाल वसावा, माजी राष्ट्रीय युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, करण सोनवणे(जळगाव), कैलास पवार (नाशिक), भगवान वळवी(धुळे), डॉ.महेश मोरे, सिताराम राऊत, करमसिंग पाडवी, ॲड.अभिजीत वसावे, पाच्या पाडवी, धिरसिंग वळवी, जयसिंग वळवी, कुलदीप पाडवी, मावीमच्या अलका पाडवी, सुरेखा गावीत, रमिला वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी अशोकभाई चौधरी यांनी सांगितलं कि सर्व संपणार आहे तरी चांगली आशा करू की आपण पुन्हा पुनर्निर्माण करूया, कोणी काय केले हे पाहण्यापेक्षा आपण काय करणार हे ठरवूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगल्याभाई वळवी यांनी बालपणापासूनच मुलांना निसर्ग संवर्धनाची जाणीव करुन दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महिलांनी आपल्या हक्कासाठी जागरूक झाले पाहिजे आपला हक्क सोडता कामा नये असेही त्यांनी सांगितले. ॲड. सीमा वळवी यांनी दहेजची वाढती रक्कम नियंत्रणात आणता नवसमाज उभारावा असे मत व्यक्त केले. राजू पांढरा या जागतिक तापमान वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. डोंगर भाऊ बागुल यांनी आदिवासी परंपरा व त्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी एकत्र काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.महेश मोरे व भूदान चळवळीतील बाबा वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य राकेश वळवी, पाडवी रवींद्र गुरुजी, मांगीलाल पाडवी, योगेश पाडवी, दारासिंग पाडवी, चंद्रसिंग पाडवी, विनोद पाडवी यांनी परिश्रम घेतले.
————————————
◾आधुनिक साधने सभ्य संस्कृतीला धोका:-
ॲड.वळवी.
विज्ञानापूर्वीच्या आदिवासी वैज्ञानिकांनी अनेक वाद्ये निर्माण केली होती. त्या वाद्यांचा मानवी जीवन व पर्यावरणावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. ही वाद्ये आधुनिक वाद्यांमुळे कालबाह्य होऊ लागली. तसे आधुनिक साधनांमुळे संवाद तुटत चालल्याचे म्हणत ॲड. पद्माकर वळवी यांनी सांस्कृतिक धोका वर्तवला. नदीजोड प्रकल्प व पुनर्वसनबाबत बोलताना ॲड.वळवी पुनर्वसन झाल्यास आदिवासींच्या अर्थकारणाला बळ देणारी डेरेदार झाडे मिळणार नाही, देव-देवतांची पवित्र भूमी हिरावली जाईल, पुढे सांस्कृतिक मुल्ये इतिहास जमा होतील. असे म्हणत ॲड. वळवी यांनी बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभव मिळवून देण्याच्या उपक्रमात योगदान देण्याचे आश्वासन दिले.
———————————-
◾ निसर्ग संवर्धन ही आदिवासींचीच जबाबदारी नाही:- सोनवणे.
निसर्ग संवर्धन ही का फक्त आदिवासीचीच जिम्मेदारी आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी कोरोना कालावधीत सर्व समाजातील धावपळ उलगडली. झाड लावण्यासाठी प्रत्येक समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. कारण ऑक्सिजन केवळ आदिवासीच घेत नाही तर सर्व मानव जातीला त्याची आवश्यकता आहे. पूर्वी पहाडात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे स्वागत सातपुडा घनदाट जंगलाच्या माध्यमातून करत होता. अशा या वैभवशाली सातपुड्यात आज व्यावसायिक बुद्धीचा शिरकाव झाला त्यामुळे ओसाड परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
——————————–
◾सरकार व योजना आदिवासींना वाचवणारा नाही:-डॉ.सुनिल पऱ्हाड.
आदिवासी समाज वाचवण्यासाठी केवळ स्वावलंबी जीवन व आदिवासी मूल्यांचा अवलंब करावा. कुठलेही सरकार किंवा योजना आदिवासीला वाचवू शकत नाही. जंगल वाढवले तर आज रोजगारासाठी भटकणारे सातपुडावासी इतरांना रोजगार देणारे बनतील. संस्कृती व परंपरा ही प्रत्यक्ष जगणे शिकवते. पुस्तकी परंपरा काही कामाच्या नाही, संस्कृती टिकवणे ही प्रत्येक आदिवासी बांधवांची जबाबदारी आहे, असेही डॉ.पऱ्हाड यांनी सांगितले.
———————————
◾ आदिवासींमध्ये १२२ रानभाज्या:- सी.के.पाडवी
आदिवासी समाजाची मोठी आचारसंहिता आहेत, ती समतेच्या आधारावर प्रत्येकाच्या नैसर्गिक हक्कांचे रक्षण करते अन् निसर्गाचाही समतोल साधला जातो. फळ-फुले, जल-जंगल यांचा प्रत्येकाला उपभोग घेता येतो. आज आदिवासी १२२ रानभाज्यांचा आपल्या आहारात उपयोग करीत आहे. या भाज्या आत्मबळ व रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी असल्याचे म्हणत सी. के.पाडवी यांनी या भाज्या कायम मिळाव्या म्हणून प्रत्येकांनी झाडे लावावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
◾ बांबू बियाणे वाटप:-
बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभव मिळवून देणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून वर्षानुवर्षे बांबू व अन्य वृक्षलागवड करणारे माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी व वृक्षलागवडीचा वारसा कायम राखण्याचा संकल्प करणाऱ्या वळवी यांच्या कन्या ॲड. सीमाताई वळवी यांनी महापंचायतीत उपस्थित आदिवासी बांधवांना बांबू बियाणे वाटप केले. यामुळे आदिवासींना जीवनावश्यक अशा बांबू नव निर्मितीस हातभार लागणार आहे.