ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा : ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध मोठी मोहीम राबवत दिव्यात मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई कर निरीक्षक ललिता जाधव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली, ज्यामध्ये कर थकबाकी असलेल्या अनेक व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकण्यात आले.
दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत महापालिकेच्या कर विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या संरक्षणात ही धडक कारवाई केली असून, ज्या-ज्या व्यावसायिक गाळ्यांकडे मालमत्ता कराची मोठी थकबाकी आहे, अशा सर्व थकबाकीदारांचे गाळे सील करण्यात आले आणि त्यांच्या शटरवर अधिकृत नोटीस चिटकवल्या गेल्या.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई कोणत्याही एका विशिष्ट दुकानावर मर्यादित नसून, थकबाकी असलेल्या सर्व व्यावसायिक गाळ्यांवर सरसकट करण्यात आली आहे.
सील केलेल्या गाळ्यांवर लावलेल्या नोटीसमध्ये महापालिकेने स्पष्ट ताकीद दिली आहे की, पूर्वपरवानगीशिवाय हे सील उघडल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आर्थिक वर्ष संपत असल्याने महापालिकेने कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
