
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट
यापुर्वी प्रसिद्ध झालेला प्रभाग प्रारुप आरखडा हा गोपनियतेचा भंग करणारा असून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाईची मागणी
औरंगाबाद महापालिकेचा गोपनिय प्रभाग प्रारुप आराखडा नव्याने करावा, सोशल मिडियावर व्हायरल झालेला प्रारुप आराखडा सारखाच असल्याचा आक्षेप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. त्यामुळे हा प्रारुप आराखडा पुर्णपणे रद्द करुन नव्याने तयार करा, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी राज्य निवडणुक आयुक्तांकडे केली आहे.
सोमवारी मुंबई येथे मुख्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भातील निवेदन देऊन ही मागणी केली आहे. महापालिकेचा प्रभाग प्रारुप आराखडा सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे गोपनियतेचा भंग झाला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे देखील उल्लघंन झाले असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रारुप आराखडा रद्द करून नव्याने तयार करावा, असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या निवेदनात राज्य निवडणुक आयोगाकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने गुगल अर्थच्या नकाशावर प्रगणक गटांच्या सिमारेषा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात, प्रगणक गटांचे क्रमांक व त्या गटांची लोकसंख्या दर्शवावी, जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात, नकाशावर शहरातील महत्वाची ठिकाणे रस्ते, नद्यानाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे दर्शवावे, नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्यात, नकाशांचा आकार, त्यावर दर्शवलेले प्रगणक गटांचे क्रमांक,लोकसंख्या इत्यादी तपशील वाचता येईल असा व नकाशे हाताळता यावेत यासाठी दोन किंवा तीन भागात तयार करावेत. तसेच प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा करावा, त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शवण्यात याव्यात, त्या हद्दीवर असणारे रस्ते, नदीनाले, रेल्वेलाईन इत्यादी स्पष्टपणे असावेत. प्रत्येक प्रभागात समाविष्ट झालेले प्रगणक गट एकच आहेत याची खात्री करावी, तसेच जनगणनेकडून प्राप्त झालेली लोकसंख्या योग्यरितीने दर्शवावी व खात्री करून घ्यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापुर्वी प्रसिद्ध झालेला प्रभाग प्रारुप आरखडा हा गोपनियतेचा भंग करणारा आहे. या संदर्भात संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तशीच उच्चस्तरीय समिती नेमूण या संपुर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी देखील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. यावेळी माजी आमदार किशनचंद तनवाणी, ऍड. आशुतोष डंख उपस्थित होते.