दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -किशोर वाकोडे
बुलडाणा : दि.८.गेल्या आठ दिवसांपासून राज्यात होत असलेला पाऊस हा नुकसानीचा ठरत आहे. यामुळे पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण शेतजमिनी खरडून गेल्या आहेत तर अनेक ठिकाणी मनुष्यहानीही झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथेही अशीच दुर्घटना घडली असून नदीचा पूल ओलांडत असताना बैलगाडी तर वाहून गेली शिवाय पुराच्या पाण्यात शेतकरीही अडकला होता. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखविल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला आहे. मात्र, आठ दिवसांपूर्वी जो पाऊस शेतकऱ्यांना हवाहवासा होता तोच आता नकोसा झाला आहे. राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी सर्वच ठिकाणी समसमान अशी स्थिती नाही. त्यामुळे कही खुशी..कही गम असाच पाऊस राज्यात बरसत आहे.
नेमकी घटना काय घडली?
गेल्या काही दिवसांपासून चांडोळ परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे गावालगतच्या नदीला पूर आला असताना देखील शेतकरी रईस खान शब्बीर खान यांनी बैलजोडी पाण्यात घातली. दरम्यान, अचानक धामना नदीचा प्रवाह वाढला, त्यामुळे बैलगाडी सोबत रईस ही पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, तेव्हा रईस खान याने कसे बसे आपले प्राण वाचवले. एक बैल नदीच्या पाण्यातून बाहेर आला तर दुसरा बैल गाडीसोबतच वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
सततच्या पावसाने नदीला पाणी
बुलडाणा जिल्ह्यात पावसामध्ये सातत्य तर राहिलेले आहे पण जोरही वाढत आहे. सध्या खरिपाची लगबग असल्याने पडत्या पावसामध्ये शेतकरी शेत जवळ करीत आहे. मात्र, गावालगत असलेल्या धामना नदीचा प्रवाह वाढला असून अधिकचा पाऊस झाला की, नदीला पूर हे ठरलेलेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नको ते धाडस करु नये असे आवाहन लोकप्रतिनीधींनी केले आहे. शिवाय आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
