
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा – दि.१२.महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता जायभाये यांच्या दालनात रविकांत तुपकर यांनी ४ तास ठिय्या मांडला.बुलडाणा जिल्ह्यात शासनाकडून शेतकर्यांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोहित्रे मंजूर झाली आहेत व त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध झाला असून मे महिन्यात रोहित्रांच्या कामांच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु पावसाळा सुरू झाला तरी काही ठेकेदारांनी कामे सुरूही केलेली नाहीत.
ही प्रलंबित कामे आता पूर्ण करतांना पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तरी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई देवून महावितरणने ही कामे तात्काळ पुर्ण करावीत या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी शेलोडी (ता.चिखली) सह इतर गावांतील शेतकऱ्यांना घेऊन महावितरणच्या कार्यालयात ठिय्या मांडला. या रविकांत तुपकर यांच्यासोबत सर्व शेतकरी मुक्कामाच्या तयारीनेच गेले असल्याने त्यांनी तिथेच जेवणही केले.
रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर ४ तासांत महावितरण प्रशासन हादरले आणि ८ दिवसांच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन महावितरणने दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. जर महावितरणने दिलेले आश्वासन पाळले नाही तर मात्र महावितरणला आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.