
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा त्यांचे नाव शिंदे गटाशी जोडण्यात येत असून यामुळे नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर नांदेड येथील त्यांच्या तरोडा नाका येथील ‘तुळजाई’ निवासस्थानी आणि याच भागातील ‘गोदावरी अर्बन’च्या मुख्य शाखेला नांदेड पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार हेमंत पाटील शिंदे गटात जाणार का? अशा चर्चा सुरू झाली असून नवी दिल्लीत दुपारनंतर ते आणि इतर खासदारांची पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात मागील पंधरा दिवसांपासून राजकीय घडामोडी लक्षात घेता शिवसेनेतून बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सोबत घेऊन भाजपची सलगी गेली आहे. त्यानंतर एकापाठोपाठ एक शिवसेनेचे नेते आणि आता अनेक खासदारही शिंदे गटात सामील होत आहेत. कालच शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांना शिंदे गटाकडून नेते पदावर निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र सुरू आहेत, याचा अद्याप कोणीही खंडन केलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हेमंत पाटील यांच्यासह बारा खासदार ऑनलाईन मीटिंगमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.