
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी शहर व लगतच्या परिसरात ॲटो रिक्षातून व पायी प्रवास करताना दिवसा ढवळ्या प्रवाशांची होणारी लूट, भूरट्या चो-या, घरे व दुकान फोड्यांच्या प्रकारात दिवसेंदिवस अधिकच वाढत होतं आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि अपूरे पोलीस बळ यातील कमालीची तफावत पहाता भूरट्या चोरांनी चांगलेच डोके वर काढल्याचे दिसत आहे. त्याचाच परिपाक म्हणून काल शहरातील रामकृष्ण नगरात एका सेवानिवृत्त महिला शिक्षिकेला लूटण्याचा जो प्रकार घडला आहे, तो अंगावर शहारे आणणारा व निंदनीय असाच म्हणावा लागेल.
मागील काही दिवसांपासून शहरात सुरु असलेले लुटीचे व भूरट्या चो-यांचे प्रकार तसेच घरे आणि दुकाने फोडीचे प्रकार अधिकच वाढीस लागले आहेत. त्यामुळे नागरिक व व्यापारी वर्गात कमालीची भीती व्यक्त केली जात आहे. पायी अथवा वाहनांतून प्रवास करताना किंवा खरेदी करताना प्रत्येकाला भयान अवस्थेतून मार्गक्रमण करावे लागत आहे. अपू-पोलीस बळामुळे नागरिक वा व्यापारी वर्गाला कोणतीही सुरक्षा मिळत नसल्याने सराईत व भूरट्या चोरांचाच सुळसुळाट अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.
त्याचाच परिपाक म्हणून नारायण चाळीत व अन्य एका ठिकाणच्या अशा दोन दुकानात जबरी चोरी केल्याचे प्रकार घडले आहेत. तर दुसरीकडे रामकृष्ण नगरात रिक्षातून प्रवास करणा-या एका सेवानिवृत्त महिला शिक्षिकेच्या अंगावरील सुमारे नव्वद हजार रुपये किमतीचे दागिने लुटून पोबारा केला आहे. दिवसा ढवळ्या घडणा-या अशा घटनांमुळे नक्कीच संस्थांची घरघर लागली जाणे स्वाभाविक आहे. रिक्षा चालक आणि भूरटे चोर यांच्यात काही तरी संगनमत तर नसावे ना, अशीही दाट शंका घेतली तर वावगे ठरु नये.
शहरातील नवा मोंढा व अन्य पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांचा व त्यात लिप्त आरोपींचा अद्याप शोध न लागल्याने नागरिक व व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे समजते.
शहरातील वाढती लोकसंख्या व अपूरे पोलीस बळ यातील तफावत दूर करण्यासाठी कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून ख्याती मिळवलेले जयंत मीना हे कडक प्रशासक आहेत, त्यांनी याकामी पुढाकार घेऊन शहर व नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक बळ मिळवले तर उपयुक्त ठरु शकेल. आमदार, खासदारांसाठी या लोकप्रतिनिधींनी सुध्दा यात लक्ष घालून पोलीस बळ वाढवण्यासाठी ची शिफारस गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केल्यास पोलीस अधीक्षकांचीही ताकद वाढू शकेल यात शंकाच नसावी.
एकूणच शहर व परिसरात गुन्हेगार व गुन्हेगारीचा वाढता रेषो ध्यानी घेता प्रशासन व राजकीय मंडळींनी शहर व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकत्र येणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.