
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
राजूरा
राजूरा महसूल विभागातच नव्हे तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल खात्यात एक आदर्श तलाठी म्हणून ओळख असणाऱा व विदर्भ पटवारी संघटनेतील जिल्हा शाखेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची धूरा सांभाळणारा तलाठी विनोद गेडाम यांस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने काल गुरुवार दि.१९जूलैला संध्याकाळी एका लाच मागणी प्रकरणात त्याचे राजूरा येथील निवासस्थानावरुन ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या घटने बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते कि राजूरा उपविभागातील तलाठी विनोद गेडाम हे सध्या वरुर रोड येथे तलाठी साजावर पटवारी म्हणून कार्यरत आहे.त्यांनी वरुर रोड येथील तक्रारदार यांचे दि. ८-२-२०२१ ला रेतीचे एक वाहन पकडले होते.त्या नंतर त्या रेती वाहन मालकाकडे तब्बल ७० हजार रुपयांची मागणी केली होती.दरम्यान याच कालावधीत त्या रेती व्यवसाय मालकाकडून तलाठी विनोद गेडाम यांनी ३५ हजार रुपयें घेऊन त्याचा रेतीचा ट्रक सोडून दिला होता.हा ट्रक सोडतांना उर्वरीत ३५ हजार रुपये नंतर देण्याचे ठरले होते. या नंतर एसीबी पथकाच्या पडताळणी दरम्यान तडजोडी अंती लाचखोर तलाठी विनोद गेडाम यांनी तक्रारदार कडे २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लाचखोर तलाठ्यावर गुन्हा नोंदविला असल्याचे समजते.उपरोक्त कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते , यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे , नापोशी नरेश कुमार नन्नावरे पोलिस शिपाई रोशन चांदेकर,रवि ढेंगळे , संदेश वाघमारे,मेघा मोहुर्ले , चालक पोलिस शिपाई सतिश शिडाम व त्यांचे पथकाने काल रात्री उशिरापर्यंत कारवाई केली . दरम्यान या कारवाई मुळे अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. विनोद गेडाम यांचे तलाठी दप्तर मधील जरी कार्य उल्लेखनीय असले तरी या लाचखोर प्रकरणाने तो आता चांगलाच चर्चेत आला आहे. शासनाचा गल्लेलठ्ठ पगार उचलणा-या या तलाठ्याने रेती वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करून ते प्रकरण तहसीलदार यांचे कडे न पाठविता स्वताच्या स्वार्थासाठी ही लाच मागितली असल्याची चर्चा संपूर्ण राजूरा नगरीत आहे. पण शेवटी हे प्रकरण त्याचेच अंगलट आले असल्याचे आता सर्वत्र बोलल्या जाते.काही वर्षांपूर्वी पूर्वी याच पटवा-यास त्याचे तलाठी दप्तर मधील उल्लेखनीय कामगिरी बाबत शासनाच्या वतीने नागपूर मुक्कामी एका कार्यक्रमात आदर्श तलाठी म्हणून त्यास मान्यवर मंडळी समक्ष गौरविण्यात आले होते .