
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-मतदार यादी शुध्द,अचूक व परिपूर्ण होण्यासाठी मतदारांच्या आधार क्रमांकाची जोडणी करण्यासाठी कार्यक्रम दि.१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.मतदारांनी आपले आधारकार्ड प्रत व तपशील दि.१ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ या कालावधीत मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाव्दारे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम,२०२१ अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,१९५० आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,
१९५१ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असुन त्याअंतर्गत मतदार नोंदणी व मतदार यादी संबंधित नमुना अर्ज क्र. १, २, २अ, ३, ६, ७, ८, ११, १९अ, ११ ब, १८ आणि १९ अर्जामध्ये बदल करण्यात आलेले आहेत.नमुना अर्जामध्ये करण्यात आलेले सदर बदल हे दिनांक १ ऑगस्ट २०२२ पासुन अंमलात येत आहेत.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,१९५० मधील कलम २३ मधील दुरुस्तीनुसार विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्याकरीता तसेच मतदार यादीतील त्यांचे नोंदीचे प्रमाणीकरण करणे तसेच एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा त्याच मतदार संघात त्याचे नाव एकापेक्षा जास्त नोंदविले गेले आहे किंवा कसे याची पडताळणी करता यावी याकरिता विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्र.६ ब मध्ये त्यांचा आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे दाखल करावयाचा आहे.
मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी ऑनलाईन (सुविधा पोर्टल व अँप) या सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार असुन त्याद्वारेही मतदार आपला आधार क्रमांक नोंदवू शकतील.मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन ही करण्यात येत आहे.पहिले विशेष शिबीर दिनांक ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणारआहे व नंतरच्या विशेष शिबीराच्या तारखा वेळोवेळी जाहीर करण्यात येतील.
मतदारांनी नमुना अर्ज क्र.६ ब चे किंवा अन्य मार्गाने त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीतील नोंदीशी जोडणे हे संपूर्ण ऐच्छिक आहे.मतदार केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थ आहे म्हणून त्यांचे नाव मतदार यादीतून काढून टाकले जाणार नाही.मतदार यादी शुध्द,अचूक व परिपूर्ण होण्याचे अनुषंगाने सर्व मतदारांनी दिनांक १ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १ एप्रिल २०२३ पर्यंत आपले आधार संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे दाखल करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.