
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
पूर्णा नगरपरिषदेत आर्थिक संधान साधत करण्यात आलेल्या नियमबाह्य नोकर भर्तीमुळे अखेर दोन अधिका-यांचे निलंबन झाले.
पूर्णा नगरपरिषदेत मागील काही दिवसांपासून नोकरभरती प्रकरणी मोठ्या प्रमाणात गदारोळ उठला होता. राजकारणी मंडळी, अधिकारी-कर्मचारी व पत्रकार या सर्वांनी मिळून नगर परिषदेत उडालेली भ्रष्टाचाराची ही राळ थेट परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यापर्यंत पोहोचवली. आर्थिक संधान साधत न.प. मधील ज्या दोन अधिका-यांनी गैरमार्गाने व नियमबाह्य नोकर भरती केली त्याचा छडा लावण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मुख्याधिकारी अजय वर्षे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले.
पूर्णा नगरपरिषदेतील कर्मचारी सय्यद इम्रान व लिपीक नंदलाल चावरे या दोघांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी आस्थापना विभागात केलेले हे नियमबाह्य नोकर भरती प्रकरण मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या चौकशीतून निष्पन्न झाले.
वेतन काढण्याच्या यादीत जी नावे समाविष्ट केली त्या कर्मचा-यांची व यात जे लिप्त आहेत, त्यांची कसून चौकशी झाल्याने उजेडात आलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी न.प.मधील दोन अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मुख्याधिकारी अजय नरळे यांना दिले.
कर्तव्यात कठोर, शिस्तप्रिय आणि अंगी बुध्दीमत्ता व चतुरपणाची ख्याती असलेल्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व मुख्याधिकारी अजय नरळे यांनी एवढ्यावरच न थांबता पूर्णा नगरपरिषदेत आणखी काही भ्रष्टाचार झाला आहे का, याचीही सखोल चौकशी करुन त्याची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे, असेही जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. एकूणच हे प्रकरण खणून काढत भ्रष्टाचार लिप्त अधिका-यांना निलंबित केल्याबद्दल जिल्हाधिकारी गोयल यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.