
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी महापालिकेअंतर्गत मान्सून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून नागरिकांच्या सोयीसाठी तो कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे.
संततधार कोसळणाऱा पाऊस, सोसाट्याचा वारा परिणामी नद्या-नाल्यांना येणारे पूर, शहर वा लगतच्या परिसरात घुसणारे पूराचे पाणी, वीजेचा लपंडाव आदी भयाण परिस्थितीत होणारे मानवी, आर्थिक नुकसान तात्काळ टाळणे शक्य व्हावे, आलेल्या तक्रारींची दखल घेऊन यासाठी तैनात मानवीय, यांत्रिकी व सुरक्षा बल तात्काळ रवाना करता यावे म्हणून महापालिका इमारतीत आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे.
महापालिका क्षेत्रातंर्गत नैसर्गिक आपत्ती सारखी भयानक परिस्थिती कोठेही निर्माण झाली तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तीन पाळ्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. विद्यमान पाऊस कालावधीत संततधार पर्जन्यवृष्टी मुळे शहरात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पूराचे पाणी घुसले असल्यास, घरांची, दुकानांची किवा झाडांची आणि वीजेच्या खांबाची पडझड होऊन त्यात मानवीय अथवा अन्य मार्गाने होणारी कोणतीही हानी तात्काळ दूर करता यावी यासाठी नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२६३७५ व टोल फ्री क्रमांक १८००२३३१३६८ यावर संपर्क करणे आवश्यक आहे. कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची नोंद करणे व त्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.