
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : चला अभिमानाने उभारू राष्ट्रध्वज !
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि. १२ मार्च २०२१ ते दि.१५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव“ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दि. १३ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झंडा“ हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे.
केंद्रीय गृह विभागाच्या दि. ३० डिसेंबर २०२० रोजीच्या अधिसूचनेनुसार तसे आदेश देण्यात आले आहेत.