
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : एक सामान्य माणूस राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे जनतेनं पाहिलं. मी दुर्गम भागातून ठाण्यात आलो. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या सानिध्यात काम केलं.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज मी राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलोय. याबाबत मला देखील विश्वास बसत नव्हता. मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. त्याआधी तीन-चार दिवस मी झोपलो नाही. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता. पण एक-एक माणूस जोडत गेला आणि जगात माझं नाव झालं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्याआधीचा किस्सा सांगितला. ते वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात धनगर समाजाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. राज्याचा दौरा सुरु करण्यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात धनगर समाजाकडून विशेष सन्मान करण्यात आला.ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल शिंदे यांचा घोंगडी,ढोल देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधीत करताना शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
धनगर समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात करण्यात आलं होतं. या विशेष मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अखिल धनगर समाजाकडून ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घोंगडी ढोल देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ढोल देखील वाजवला. यावेळी दादा भुसे, सुहास कांदे, संजय राठोड, संदीपान भुमरे उपस्थित होते.
मेळाव्यात एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या ५० आमदारांना सांगितलं की, मी एकटा मुख्यमंत्री नाही, तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात. जे जे भेटत आहेत , ते सगळे मुख्यमंत्री आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन राज्यात हे युतीचे सरकार आणले. पण दुर्दैवाने अडीच वर्षांवपूर्वी असं झालं नाही. म्हणून आता चूक दुरुस्त करू.
‘एक एक माणसं जोडली गेली आणि जगात माझं नाव झालं. ते रोज म्हणायचे की सगळे आमच्या संपर्कात आहेत. आम्ही जी लढाई लढलो, ती आम्ही जिंकलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. हे शेतकऱ्याचं, मेंढपाळाचं, रिक्षावाल्याचं आणि काम करणाऱ्यां प्रत्येकाचं सरकार आहे. तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्यात मी नक्की हात घालणार आहे.न्यायालयात पुरावे लागतात आणि ते सगळं तिथे मांडावे लागते. ओबीसीचा निर्णय हा किती महत्वाचे आहे ते कोर्टात पटवून दिलं. आम्ही ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला,असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं.