दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
सदरची व्हायरल क्लीप बघितल्यानंतर चालू वार्ता ने वृत्त संकलित करुन शासन-प्रशासनाचे या घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे उभय राज्यात याची ठिणगी उडून कायदा व सुव्यवस्था चिघळली जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी शासनाला सतर्क केले.
छत्रपती शिवरायांचा छोटासा स्टॅच्यू गाडीमध्ये ठेवलेला असेल आणि त्या गाडीला वर जाण्यास जर
प्रवेश नाकारला असेल तर जो कोणी दोषी असेल
त्याच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे आणि व्हायरल झालेली चित्रफीत दाखवून शिवप्रेमी आणि बालाजी भक्तांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव खेळत असेल, शिवभक्त आणि बालाजी भक्तांमध्ये वैर निर्माण व्हावे, आकस निर्माण व्हावा असा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमी सुभाष जावळे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन दिल्यानंतर ठणकावून सांगितले.
ते पुढे असेही म्हणाले की, महाराष्ट्रातले भक्त छत्रपती शिवरायांना मानतात तेवढेच पांडुरंगाला मानतात किंबहुना त्याहीपेक्षा अधिक तिरुपतीच्या बालाजीला मानणारी ही भक्त मंडळी महाराष्ट्रातून तिरुपतीला दर्शनासाठी सातत्याने जात असतात. शिवरायांना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात मानतात नव्हे नव्हे जगातही मानतात. कदाचित ही घटना जर खरी असेल तर तिरुपतीच्या चेक पोस्टवर ज्या कोणी शिवरायांच्या स्टॅच्यू विषयी हा जो निंदनीय प्रकार केला आहे त्याची कसून चौकशी झाली पाहिजे व त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आंध्राच्या मुख्यमंत्र्यांशी योग्य ते बोलून संबंधितांवर कारवाई करणे भाग पाडले पाहिजे एवढीच आमची मागणी असल्याचे श्री. जावळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर सांगितले.
दरम्यान आंध्रप्रदेश मधील या कथित घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून यावर वेळीच आवर घालून कारवाई न झाल्यास प्रकरण अधिकच चिघळले जाईल याचीही शाश्वती देता येणार नाही. याची कटाक्षाने दक्षता न घेतल्यास कदाचित हे प्रकरण केंद्राकडेही जाऊ शकेल अशी दाट शक्यता दिसून आल्यास वावगे वाटू नये.
