
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : परभणी शहरांतर्गत वसमत रोडवरील औद्योगिक नगरीच्या लगत असलेल्या स्वागत कमानीवर एका माथेफिरूने बराच धिंगाणा घातला होता. परिणामी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याने अखेर वाहतूक व शहरी पोलिसांनो घटनास्थळी धाव घेऊन त्या माथेफिरुला ताब्यात घेतले. परभणी-वसमत रोडवर तो माथेफिरू सकाळपासूनच मधोमध बसून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत होता. वाहन चालक आपापल्या परिने रस्ता काढून आपली वाहने चालवत होती. परिणामी पायी चालणाऱ्या नागरिकांनाही त्याची झळ बसली जात होती. हायवे असूनही हा प्रकार रोखण्यासाठी पॉईंटवर कोणीही वाहतूक पोलीस कर्मचारी त्या परिसरात उपलब्ध नव्हता त्यामुळेच त्या माथेफिरु ची थेरं अधिकच वाढली होती. शेवटी व्हायचे तेच झाले अन् तो माथेफिरू अचानक लगतच्या स्वागत गेटवर चढला हैदोस घालायला लागला. त्यामुळे घाबरलेल्या वाहन चालकांनी आपली वाहने पुढे न नेता जागीच थांबवली. तो वरुन खाली पडून वाहनांच्या खाली आला नि काही बरे-वाईट झाले तर नको ते बलांट आपल्यावर येईल या भीतीने जागीच थोपवलेल्या वाहनांमुळे बघता बघता कमालीची वाहतूक खोळंबली. दोन्ही बाजूने भल्या मोठ्या रांगा लागल्या. हे भयानक वास्तव बघून नागरिकांनी पोलिसांना दूरध्वनीद्वारे घटनेची कल्पना दिली.
मिळालेल्या खबरीनुसार कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, त्यांचे सहकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. पोलीस आणि मनपा कर्मचारी यांच्या प्रयत्ना नंतरही तो माथेफिरू खाली उतरायला तयार होत नव्हता. आता आपली काही सूटका नाही या भीतीने अखेर त्याने वरुनच खाली उडी मारली.
त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. अखेर वाहतूक सुरु झाली. तो माथेफिरू नेमका कोणत्या गावचा आहे, हे जरी समजले नसले तरी चौकशीतून ते निष्पन्न होईल. एकूणच काल दिवसभर चाललेल्या या भयानक कृत्याचा संध्याकाळी पोलिसांच्या प्रयत्नाने का होईना परंतु शेवट होऊन वातावरण एकदाचे स्थीर झाले.