दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
” सामान्य कार्यकर्ताही सामाजिक कार्यातून यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो.पैसा हे सर्वस्व नाही; निःस्वार्थी समाजसेवेचा आनंद हीच अक्षय संपत्ती नुरूद्दिन यांनी कमविली आहे.” असे मार्मिक प्रतिपादन जळगावचे माजी उपमहापौर तथा मौलाना आझाद विचार मंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.करीम सालार यांनी व्यक्त केले. बेलदार समाज सभागृह कासोदा ( तालुका एरंडोल ) येथे रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी कासोदेकर प्रसिद्ध समाजसेवक अर्थात ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना मानद डॉक्टर उपाधी मिळाल्याबद्दल गौरव समारंभ तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तम यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मौलाना आझाद विचार मंच त्रिशक्ती गृप महाराष्ट्र राज्य व मित्र परिवारातर्फे उत्साहात संपन्न झाला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.सालार बोलत होते.विचारमंचवर प्रमुख अतिथी कासोदा सरपंच महेश पांडे,प्रमोद पाटील चिलाणेकर, ( मुख्याध्यापक, धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळा, आडगाव ),पत्रकार प्रतीक जाधव,डॉ.मोहम्मद सादिक शेख,भुसावळ उपस्थित होते.प्रारंभी गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ.करीम सालार तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सत्कारित करण्यात आले.इंडियन मुस्लिम फ्रंट पुणे तर्फे महाराष्ट्र कर्मचारी सदस्य जुल्फीकार अली यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना गौरवण्यात आले.गिनीज बुक मध्ये नोंद झालेले जळगाव येथील चित्रकार सुनील दाभाडे यांनी रेखाटलेले समाजसेवक नुरुद्दीन मुल्लाजींचे छायाचित्र देऊन दाभाडे यांनी सन्मानित केले.
डॉॅ.कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे विशेष सन्मान
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे मानद डॉक्टरेट उपाधी मिळाल्याबद्दल पत्रकार तथा समाजसेवक नुरुद्दिन मुल्लाजी कासोदेकर यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय सुपडू लुल्हे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.” प्रजा न्यूज ” चॅनेलचे संचालक तथा पत्रकार प्रतिक जाधव व धुळे येथील ” देश की समस्या ” चॅनलचे संचालक तथा पत्रकार अब्दुल हाफिज अब्दुल हक तसेच.अ.भा.मराठी साहित्य परिषद शाखा जळगाव जिल्हाध्यक्ष पदी सन्माननीय नियुक्ती झाल्या प्रित्यर्थ मुख्याध्यापक मा.प्रमोद पाटील चिलाणेकर यांचाही शाल व ग्रंथभेट देऊन विजय लुल्हे यांनी विशेष सन्मान करून पुढील उज्ज्वल कार्याला शुभकामना दिल्या.
सत्कारार्थी नुरुद्दीन मुल्लाजी यांनी सर्व घटकातील सामान्यजनांना न्याय मिळवून देण्याचे नुरुद्दिन मुल्लाजी भाईंचे निर्भय कार्य संस्मरणीय आहे असे गौरवपर भाषणात मुख्याध्यापक प्रमोद पाटील म्हणाले.पत्रकार प्रतीक जाधव,एरंडोल माजी नगरसेवक शिवाजी अहिरराव सर,डॉ.सादिक शेख यांनीही नुरुद्दिन मुल्लाजी यांच्या सर्वधर्मिय,सर्वस्तरीय व सर्वस्पर्शी पत्रकारीता तसेच सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत तत्वनिष्ठ व निःस्वार्थी गुणवैशिष्ट्ये सोदाहरण भाषणात सांगितली.
सत्कारमूर्ती पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी मनोगतात म्हणाले की,”सत्कार समारंभ मला निरंतर चंदनाप्रमाणे झिजण्याची अखंड प्रेरणा देणारा आहे.निरंतर समाज कार्यातच माझे चिरतारुण्याचे रहस्य दडले आहे हे सोदाहरण सांगितले.
कार्यक्रमास उपसरपंच अब्दुल अजीज सर,ग्रामपंचायत सदस्य बंटी चौधरी व भैय्या राक्षे,मुश्रीम पठाण,अश्फाक अली,अबू फिरोज शेख,अरिफ मण्यार, ॲडव्होकेट जयेश पिलोरे,अमजद खान,इस्माईल खान,शहजादी उर्दू हायस्कूलचे चेअरमन जमीर अली यांच्यासह गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व पालकवर्ग,जिल्ह्यातील पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक व सुत्रसंचालन मुजाहिद खान व आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष आरिफ पेंटर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौलाना आझाद विचार मंचचे आरिफ पेंटर,सलाउद्दीन अल्लाउद्दीन,शेख मन्सूर पठाण,अन्वर मिस्तरी व जबा मिस्तरी यांनी अनमोल परिश्रम घेतले.
