
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
शिऊर : वारकरी संप्रदायाचे शिखरस्थान असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान फडाचा २७७ वा फिरता अखंड हरिनाम सप्ताह आज दिनांक २ ऑगस्ट पासून सुरू होत आहे, आठ दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ज्ञानदान व अन्नदानाचा महाजागर होणार आहे.
आज सकाळी शिऊर गावातून भव्य मिरवणूक निघणार असून या सप्ताह निमित्ताने शिऊर येथील ग्रामस्थ आपल्या घरावर गुढी उभारणार आहेत, सोबतच प्रदक्षिणा मार्गावर रांगोळी देखील काढण्यात येणार आहे, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन, ध्वज पूजन, मंडप पूजन, टाळ पूजन, ग्रंथ पूजन, प्रतिमा पूजन, विणा पूजन करण्यात येऊन सप्ताहाला प्रारंभ होईल.
आज सकाळी चंद्रभान दादा चिकटगावकर यांचे कीर्तन तर रात्री पंडित महाराज कोल्हे यांचे कीर्तन होईल. दरम्यान आज शिऊर व सफियाबादवाडी ग्रामस्थांच्या वतीने पुरणपोळीचा प्रसाद देण्यात येणार आहे, दरम्यान भव्य कीर्तन मंडप, भटारखाना, व मंदिरावरील आकर्षक रोषणाई लक्षवेधी ठरत आहे, डॉ गणेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने सप्ताह काळात मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील होणार आहे,
सप्ताहाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे, सचिव एकनाथराव जाधव , बंडोपंत लाखेस्वामी आदींनी केले आहे.