
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-
परभणी : गावात निर्माण होणारे तंटे-बखेडे थेट पोलीस ठाण्यावर नेऊन त्यांची उकल करण्यापेक्षा ते आता त्या त्या गावातच सोडविले जाणार असून त्यासाठी संबंधित पोलीस पाटील यांना हक्काचे कार्यालय शासनातर्फे मिळणार आहे. शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केल्याचे समजते. ग्रामपंचायतींच्या बरोबरीने गावाचा गाडा हाकताना पोलीस पाटील यांचेही तेवढेच योगदान असते. तथापि यापूर्वी सोडविले जाणारे तंटे खर्चिक व त्रासदायक असेच काहिसे होते. पोलीस कर्मचारी, बीट जमादार किंवा पोलीस अधिकारी यांचा तासन् तास किमती वेळ घालवणे, तेवढं करुनही आणखी पुन्हा कधीतरी अशा सबबींवर तारखांवर तारखा देणे, शिवाय तक्रारदार व ज्यांच्या विरोधात तक्रार करणे आहे ते एक किंवा अधिक, शिवाय संबंधित गावचे पोलीस पाटील आदींचाही मौलिक वेळ घालवणे हे सारे महत्प्रयाशी असेच ठरले जायचे. या व अशा अनेक बाबी लक्षात घेऊन शासनाने राज्यातील सर्व पोलीस पाटलांचे स्वत:चे कार्यालय गावात असाच निर्णय घेतल्याचे कळते. ज्यामुळे महिनोंमहिने नव्हे नव्हे वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारी भांडणे आता गावातील पोलीस पाटलांना स्थानिक पातळीवरील आपल्या कार्यालयातच सोडवता यावेत म्हणून अशी कार्यालये मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
पूणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अशी सुरुवात झाल्याचे कळतेय. नुकताच तेथे एका पोलीस पाटील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी पोलीस अधिकारी, वरिष्ठ नागरिक व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. तसं झालं तर खरोखरच आनंददायी बाब ठरल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित.