
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर–
देगलूर तालुक्यातील बोरगाव येथे साहित्यसम्राट, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कैलास येसगे कावळगावकर यांनी ‘सर्वच महामानवांनी आयुष्यभर शोषित, वंचित, कष्टकरी समाजाला न्याय व सन्मान मिळवून देण्याचे मानवतावादी कार्य केले. म्हणून त्यांच्या विचारांचे अनुयायी म्हणून आपण सद्य परिस्थितीतील प्रश्न समजून घेऊन शेतकरी, कष्टकरी, वंचित व निराधारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत समाज समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे हीच महामानवांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले.’ महात्मा बसवेश्वर, संत तुकोबा, संत कबीर, संत सेवालाल, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा या सर्वच महामानवांनी शोषित समाजाला न्याय मिळावे म्हणून कार्य केले. आपणही महामानवांकडून प्रेरणा घेऊन कार्य करत राहू असा निश्चयरूपी कानमंत्र कैलास येसगे यांनी याप्रसंगी उपस्थित सर्व श्रोत्यांना दिला.
यावेळी टायगर ग्रुपचे अध्यक्ष संगम बैलके, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष अल्लापूरकर, काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष संजय गवलवाड, सिद्धार्थ ढवळे, बालाजी गवलवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पाटील शिंदे, गुणवंतराव गोपछडे, यादवराव बोरगावकर, माजी सरपंच शिवाजी बोडके, पोलिस पाटील बोडके, जयंती मंडळाचे तरूण कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.