
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि. ११: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियान’ देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानातील एक भाग म्हणून १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आगाखान पॅलेस व राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र येथे तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. आगाखान पॅलेस येथील कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
तसेच स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंब व युद्धात वीर मरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित देशभरातील ४०० ठिकाणी मान्यवर व्यक्ती प्रत्यक्ष भेट देणार आहेत. केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयद्वारा जाहीर करण्यात आलेल्या या ठिकाणात पुण्यातील आगाखान पॅलेस व राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र या संस्थांचाही समावेश आहे.
आगाखान पॅलेस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण स्थान होते. याठिकाणी ९ ऑगस्ट १९४२ ते ६ मे १९४४ दरम्यान महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी , सचिव महादेवभाई देसाई, मीराबेन, प्यारेलाल नायर, सरोजिनी नायडू आणि डॉ. सुशीला नायर बंदिस्त होते. कस्तूरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचा याठिकाणीच मृत्यू झाल्यामुळे महात्मा गांधींना या ठिकाणाची विशेष ओढ होती. या दोघांची समाधी याठिकाणी आहे. आगाखान पॅलेस मध्ये सध्या नॅशनल मेमोरियल सोसायटीचे मुख्यालय आहे.
‘बापू भवन’ या ऐतिहासिक वास्तूत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (एनआईएन) या संस्थेची डॉ. दिनशॉ मेहता यांनी स्थापना केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संस्थेला भेटी दिल्या आहेत. त्यांनी या संस्थेत काही दिवस मुक्काम देखील केला आहे. या संस्थेने ‘ऑल इंडिया नेचर क्योर फाउंडेशन ट्रस्ट’ ची स्थापना केली. या ट्रस्टचे अध्यक्ष महात्मा गांधी होते.