
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
——————————
परभणी : जागोजागी पावसाच्या पाण्याने भरलेली डबकी, सोबतीला चिकन मातीचा चिखल, परिणामी न सांगता अचानक बंद पडणाऱ्या गाडी मुळे चक्क उतरुन तशा चिखलातून ही पायीच चालणे भाग पडल्याशिवाय राहातं नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की, पांढरा शुभ्र पुढार्यांचा युनिफॉर्म प्रसंगी चिखलाने माखला जातो. याच पांढ-या पुढा-यांना व सामान्य जनतेलाही सुकी गावचा रस्ता पूरता दु:खी करुन टाकतो एवढं नक्की.
परभणी शहरापासून अवघ्या २५ कि.मी. अंतरावर सुकी नावाचं गाव आहे. पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव. काळ्या आईची मशागत करुन खाणारे कष्टकरी, शेतमजूर घाम गाळत असतात. तर काही शेतकरी स्वतःची जमीन स्वतःच उकरुन कष्ट करतात. कामिनी त्याच शेतीच्या दिमतीला मिळेल तो व्यापार पत्करलाय. परंतु कांहीं लोकांना काम कमी तर उठाठेवी जास्त आणि त्याच उपदव्यापापायी पांढरे शुभ्र कपडे अंगावर परिधान करुन पुढाऱ्यांच्या रुपात कधी तालुका तर कधी जिल्ह्याचे ठिकाण याच रुबाबदार गाड्यावर बसून ऐटीने फिरत असतात. आजची तरुणाई कांही अपवाद वगळता ज्येष्ठांचंच अनुकरण करण्यात धन्यता मानतात. ज्यांना भविष्य काळ कळतो, ते मात्र नक्कीच आपल्या बुध्दीमतेचा वापर करुन पोटाची खळगी भरण्यासाठी जे योग्य, असंच करतात. या व अशा सर्वांनाच मग ते दुचाकी चालवणारे असोत वा चार चाकी, या सर्वांनाच पाऊस काळातील हा चिखल मात्र गाडी कितीही भारीची असो, त्यावरुन खाली उतरायलाच भाग पडतो हे नाकारुन चालणार नाही.
. भारी भारीच्या गाड्यांवर बसून रुबाबात ऐटीने मिरवण्याची लागलेली सवय संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मात्र नाईलाजाने का होईना मोडली जाते, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. अशीच कथा आणि व्यथा सुकीच्या ग्रामस्थांची आहे. दर पाच वर्षांनी येणा-या निवडणुकांमध्ये एरव्ही रुबाबात राहाणारी पुढारी मंडळी पावसाळ्यातल्या या चिखलात रुतले जाऊ म्हणून कधीच फेरी मारत नसतात. निवडणूकीत सर्वसामान्यांचे उंबरठे झिजवणारे हेच पुढारी अशा वेळी गायब होतात, त्यांना आवर्जून पावसाळ्यात बोलावून चिखलाची मजा कशी असते हे दाखविले तर नक्कीच सुकीकरांना भविष्यात कधीच दु:की व्हायची पाळी येणार नाही असं म्हटलं तर मुळीच वावगे ठरणार नाही. आजच्या तरुणाईने या व गावाच्या आणि परिसरातील विकासात्म बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची खरी गरज आहे.