
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे: शिवगंगा खोर्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. त्यांना अद्याप स्वतःची पक्की घरे नाहीत. ते वंचीत आहेत. रोजच्या उदनिर्वाहाचा प्रश्नही नेहमीच त्यांच्यासमोर असतो. मात्र, इतरांच्या शेतात काम करून पोट भरणार्या कातकरी समाजाने शनिवारी भात लावणी करताना शेतातच तिरंगा ध्वज फडकावून आपले देशावरचे प्रेम व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अभियानाला शिवगंगा खोर्यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, ज्या आदिवासी बांधवांना स्वतःची पक्की घरेच नाहीत, त्यांनी आपले देश प्रेम कसे व्यक्त करायचे, हा प्रश्न आज कातकरी समाजाला पडला.
खेड शिवापूर भागात मिळेल तिथे रोजगारी करून, तसेच नदी-ओढ्यांवर खेकडे, मासे पकडून त्यांची विविध गावांमधून फिरून कातकरी समाजाच्या नागरिकांकडून विक्री केली जाते. शनिवारी प्रत्येक घरांवर तिरंगा फडकला गेला. मात्र, हा समाज दुसर्याच्या शेतात भात लावण्याच्या कामात व्यस्त होता. ‘आपण जरी शेतात काम करीत असलो, तरीही आमचेही भारत देशावर प्रेम आहे. असे सांगून त्यांनी तिरंगा मागवून घेतला आणि ध्वजवंदन केले.