
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांनी निवासी तहसीलदार ठोंबरे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हंटले आहे की, मागील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी,वडापूरी,पंधारवस्ती,वरकुटे खुर्द, निमगाव केतकी,तरंगवाडी,शेटफळ हवेली,अंथुर्णे,बेडशिंगे,सरडेवाडी,गोखळी, इंदापूर शहरानजीक व इंदापूर तालुक्यातील विविध भागातील या गावासह इंदापूर तालुक्यातील सर्व महसूल मंडलात जोरदार पाऊस होऊन पिके पाण्याखाली गेली आहेत.
डाळिंब,मका, कांदा, बाजरी, भुईमूग, आदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जागो जागी जमीन शेवाळली आहे. तसेच अनेक ठिकाणी मातीही वाहून गेली आहे.
२४ तासात ६५ मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तरच अतिवृष्टी हा नियम वस्तुनिष्ठ नाही. त्यासह पीक विमा कंपन्यांकडून नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करणे, टोल फ्री नंबरवर तक्रार करणे यासह इतर जाचक अटी या शेतकर्यांच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. यावर तातडीने कार्यवाही करून इंदापूर तालुक्यातील गावा गावांत शेती पिकांचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत. तसेच महसूल व कृषी विभाग यांनी गाव गावात पिकांची पाहणी करावी व पंचनामे करतांना त्यात कुठलाही दुजाभाव करू नये शेतकर्यांना मदत मिळावी.
या पद्धतीने पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल पीक विमा कंपन्यांनाही पाठवावा व शासनाच्या मदतीबरोबरच पीक विमा कंपन्यांकडूनही शेतकर्यांना मदत मिळवून द्यावी व शेतकर्यांना आधार द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे निवासी तहसिलदार ठोंबरे यांचेकडे केली आहे.
या प्रसंगी ॲड.नितीन राजगुरू,झगडेवाडी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य बाळासाहेब झगडे, रणजित झगडे, अक्षय माळी, किरण वाघ, विकास शिंदे, सोमनाथ शेंडे, निखिल शिंदे, दिपक शिंदे,सुरज शिंदे, निखिल शिंदे, गणेश राऊत, संतोष शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.