
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आधार सेवा परिवाराच्या वतीने दिवाळीच्या काळात सलग नऊ दिवस गोरगरीब , निराधार , गरजू लोकांना इंदापूर व आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. इंदापूर बस स्थानकामधील रात्री मुक्कामी असणाऱ्या तसेच फुटपाथवर रात्री राहणाऱ्या गोरगरीब, गरजू ,निराधार लोकांना मोफत नऊ दिवस दिवाळी चा फराळ वाटप करण्यात आले. ऊस तोडणी मजूर व त्यांची लहान मुले यांनाही दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. भाऊबीजे निमित्त ३४ गोरगरीब , गरजू महिलांना आधार सेवा परिवाराच्या वतीने साडी व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. निमगाव केतकी येथे ऊस तोडणी महिलांना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. शालनताई गणपत भोंग यांच्या हस्ते साडी व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. इंदापूर व आसपासच्या परिसरामधील गरजू महिलांना आधार सेवा परिवाराचे अध्यक्ष श्री अरुण राऊत सर यांच्या हस्ते साडी व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी आधार सेवा परिवारातील अनेक सदस्यांनी आर्थिक मदत केली.