
जाळून घेतलं की जाळलं; अनिल परब यांचा सवाल…
शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी आज (4 ऑक्टोबर) थेट रामदास कदम यांच्या आरोपांना आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर रामदास कदम यांच्या विरोधात कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला.
13 वर्षे मौन बाळगणारे कदम यांना 13 वर्षांनी अचानक कसा कंठ फुटला, असा सवाल करत कदम यांच्या नार्को टेस्टचे आव्हान स्वीकारल्याचे अनिल परब म्हणाले. एवढेच नाही तर या नार्को टेस्टमध्ये रामदास कदम यांच्या पत्नीला 1993 मध्ये काय झाले, त्यांनी जाळून घेतले की जाळण्यात आले, याचीही नार्को टेस्टमध्ये माहिती द्यावी, असे आव्हान कदम यांना दिले. यावेळी रामदास कदम यांनी केलेल्या सर्व आरोपांना अनिल परब यांनी उत्तर दिलेच शिवाय काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात 2 ऑक्टोबर रोजी रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाबाबत मोठा दाव करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर होते. त्यांच्या पार्थिवाचा छळ करण्यात आला. शिवाय शरद पवार यांनाही बाळासाहेबांच्या पार्थिवाकडे जाऊ देण्यात आले नाही आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचे आरोप रामदास कदम यांनी सलग दोन दिवस केले होते. एवढेच नाही तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, असे आव्हानही रामदास कदम यांनी दिले होते.