काँग्रेसचा वेगळाच सूर; सांगता न येणार दुखणं !
भाजप ज्या प्रकारे एकामागून एक विजय मिळवत आहे ते पाहाता त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र यावे, अशी भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेतली जाण्याची चर्चा होती.
ठाकरे बंधूंची युती निश्चित झाली आहे. त्यामुळे मनसे देखील महाविकास आघाडीत येईल, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसने मनसेसोबत जाणार नसल्याचे जाहीर करत स्वबळाचा नारा. मुंबईत काँग्रेसचा मनसेला ठाम विरोध आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार हेही मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती असून ते स्वतः काँग्रेस नेतृत्वाशी बोलणी करण्याची शक्यता आहे.
मनसेसोबत न जाण्यासाठी काँग्रेसने हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्या, दादागिरीची भाषा करणाऱ्यांसोबत आपण जाणार नसल्याचे कारण दिले आहे. मात्र, हे कारण वरवरचे असल्याचे बोलले जात आहे. कारण काँग्रेसच्या राजकारणाचा बारकाईने विचार केला तर काँग्रेसला ठाकरे बंधुच्या युतीसोबत गेल्याने आपला कार्यकर्ते गमवण्याची भीती आहे.
महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते. 2017 मध्ये 15 टक्के मतं मिळवून काँग्रेस हा तिसरा मोठा पक्ष ठरला होता. त्यांचे 31 नगरसेवक विजयी झाले होते. तर, बऱ्याच प्रभागात त्यांचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होते. अनेक उमेदवारांचे पराजयातील अंतर देखील बरेच कमी होते.
कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जातील?
काँग्रेसकडे मुंबई महापालिकेत केवळ 15 टक्के मतं असली तरी प्रत्येक प्रभागात त्यांचा हक्काचा मतदार आणि कार्यकर्ते आहेत. ठाकरे बंधूंसोबत युती केली तर काँग्रेसच्या वाट्याला फार जागा येणार नाही. त्यामुळे त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय मिळणार नाही. जे कार्यकर्ते पक्ष मजबूत करतात तेच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांच्या आश्रयाला जातील याची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि नेते निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत.
हिंदी भाषिक दुरावतील…
हिंदी मतदाराने नेहमीच भाजपला प्राधान्य दिले आहे. मात्र, एकुण हिंदी भाषिक मतदारांपैकी अगदी 20 टक्के मतदार देखील काँग्रेसच्या बाजुने असले तरी ते देखील मनसेसोबत आल्याने आपल्या हातून जातील, अशी भीती काँग्रेसला आहे. मुळात 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 15 टक्के मतं होती आणि त्यांनी 31 जागा मिळवल्या होत्या. मात्र, ठाकरे बंधूसोबत आले तर त्यांची मतांची टक्केवारी घसरेल आणि त्यांच्या जागांमध्ये देखील मोठी घट होईल, अशी त्यांना भीती आहे.
किती जागा लढणार?
मुंबई महापालिकेत 227 जागा आहे. ठाकरे बंधूंची युती सोबत गेलो तर आपल्याला किती जागा येणार याची चिंता देखील काँग्रेसला आहे. ज्या जागांवर आपली ताकद आहे त्या जागा देखील आपल्याला सोडाव्या लागण्याची शक्यता आहे. मनसे 100 पेक्षा जास्त जागांवर लढण्यास आग्रही आहे. तर, उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील 150 पेक्षा अधिक जागा लढण्यासाठी आग्रही दिसते. त्यामुळे ठाकरे बंधुंसोबत गेलो तर हाती काहीच लागणार नाही, याची कल्पना काँग्रेस नेत्यांना आहे.
मुस्लिम मतदार दुरावणार….
भाजप आणि काँग्रेसमध्ये जेथे थेट लढत होत आहे तेथे काँग्रेसला पराभवाचा सामाना करावा लागत असल्याचे चित्र आहेत. त्यात ठाकरे बंधुंच्या युतीसोबत काँग्रेस गेली तर हिंदी भाषिक जागांवर काँग्रेस आणि भाजप अशी लढत होईल आणि त्याचा फटका देखील त्यांना बसेल. दलित, मुस्लिम हा काँग्रेसचा हक्काचा मतदार राहिला आहे. तो देखील गमवण्याची वेळ ठाकरे बंधूंच्या युतीमुळे येईल, अशी भीती देखील काँग्रेसमधील काही नेते खासगीत व्यक्त करत आहेत.
2017 पक्षीय बलाबल
पक्ष विजयी जागा मतांची टक्केवारी
शिवसेना 84 28.5
भाजप 82 27.32
काँग्रेस 31 15.95
मनसे 7 7.74


