
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली परिसरात मागील महिनाभरात सुमारे ५७ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. तर, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यातील अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. मागील आठवड्याभरात यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले आहे. मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. बावडा, इंदापूर येथे मोठ्या रुग्णालयांत अनेकजण अजूनही उपचार घेत आहेत. महिन्यात सुमारे ५७ जणांना डेंग्यू झाल्याचे उघड झाले. यातील अनेकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदची आहे. मात्र, निवडणूक लांबल्याने नेत्यांच्या हातचा कारभार एकहाती जिल्हा परिषद प्रशासनाच्या हातात आहे. मात्र, अभियान काळ सरताच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबवली जाणारी यंत्रणा सैल झाली असून, आरोग्य स्थिती हाताबाहेर जात आहे. परिणामी, झेडपीचे प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा अनुभव येत आहे.
*वैयक्तिक नागरिकांनी काळजी घेण्याची गरज*
ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये सर्वत्र बंदीस्त गटारी करून ही नागरिक सांडपाणी उघड्यावर सोडत आहेत.शेटफळ हवेली ला ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या भागात व वैयक्तिक घेतलेल्या कनेक्शन ला कोणीही नळ बसवले नसून या मधून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.आणि त्याठिकाणी पाणी साचून रहात आहे. बांधकाम सुरू असताना पाया खोदलेल्या जागी लाखो लिटर पाणी साठून राहते. तसेच, रस्त्यालगत फेकलेल्या टाकाऊ वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठून असते.पाण्याची डबकी गावभर घोंगावणार्या डासांचे अड्डे झालेत.
त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.