
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई, 7 नोव्हेंबर : आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ऑक्टोबर महिन्यासाठीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार भारतीय स्टार बॅट्समन विराट कोहलीला मिळाला आहे.
महिला क्रिकेटपटूंमध्ये ऑक्टोबर महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी पाकिस्तानच्या निदा दार हिची निवड करण्यात आली आहे. क्रिकेटपटूंमध्ये उत्साह वाढवण्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार आयसीसीकडून दिला जातो. प्रत्येक महिन्यात जे पुरुष आणि महिला क्रिकेटपटू उत्तम कामगिरी करतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा पुरुष विभागात विराट कोहलीला तर महिला विभागात पाकिस्तानच्या निदा दार हिला हा पुरस्कार मिळाला आहे.
विराट कोहलीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यातील विराटच्या उत्कृष्ट बॅटिंगसाठी हा पुरस्कार त्याला देण्यात आला आहे. ‘हा पुरस्कार मला मिळाला, ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे,’ असं हा पुरस्कार मिळाल्यावर विराट कोहलीनं सांगितलं. ऑक्टोबर महिन्यात टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं 82 रन्सची अप्रतिम खेळी केली होती.
त्या जोरावर पराभवाच्या छायेत असलेल्या भारताला ही मॅच जिंकता आली. त्यावेळी विराटनंही ही खेळी आयुष्यातली आत्तापर्यंतची सर्वोत्तम असल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय नेदरलँड्स विरुद्धही विराटनं 62 रन्स केल्या होत्या. ऑक्टोबरच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या टी-20 सीरिजमध्ये गुवाहाटीत विराटनं 28 बॉलमध्ये 49 रन्स काढल्या होत्या.
गेल्या महिन्यात 205 च्या सरासरीनं 205 रन्स केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही 150.73 इतका होता. झिम्बाब्वेचा ऑलराउंडर सिकंदर रजा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांना मागे टाकत कोहलीनं या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. महिलांसाठीच्या पुरस्कारांमध्ये ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा ऑक्टोबर महिन्यासाठीचा पुरस्कार पाकिस्तानच्या निदा दार हिला मिळाला आहे.
या पुरस्कारासाठी 2 भारतीय महिला क्रिकेटपटूंचंही नामांकन करण्यात आलं होतं. युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना मागे टाकत निदा दार हिनं हा पुरस्कार मिळवला आहे. महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघानं चांगलं प्रदर्शन करून चषक मिळवला. या स्पर्धेत पाकिस्तानच्या निदा दार हिनं अप्रतिम खेळ केला होता.
तिनं 6 मॅचमध्ये 145 रन्स करत 8 विकेट्स घेतल्या. या अष्टपैलू खेळामुळेच तिला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिनं उत्कृष्ट बॅटिंग केली होती, तर दीप्ती शर्मा हिने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हींमध्ये चांगला खेळ केला होता. मात्र प्रेक्षकांनी निदा दार हिलाच पसंती दिल्यामुळे तिला हा पुरस्कार मिळाला आहे.