दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
अधिकाऱ्यांनी सकारात्मक काम करावे.
जव्हार तालुक्याचा वीज प्रश्न सोडविणार.
जव्हार:-पालघर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश निकम यांचे जव्हार तालुक्यात रविवारी दुपारी १२ वाजता सुमारास शासकीय विश्रामगृह जव्हार येथे स्वागत पर अभिनंदन करण्यासाठी तालुक्यातील सरपंच,जिल्हा परिषद सदस्य,नगर सेवक,ज्येष्ठ नागरिक,महिला वर्ग अश्या जवळपास शेकडो नागरिक उपस्थित होते.या वेळी बोलताना निकम यांनी सांगितले की,मी कोणत्याही पक्षाचा असलो तरी विद्यमान पालघर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने जिल्हाभरातील सर्वच पायाभूत सुविधांचे प्रश्न आणि नागरिक तथा कार्यकर्त्यांच्या तक्रारी सोडून या भागात विकास कसा साधता येईल या दृष्टीने काम करणार असून त्या दृष्टीने नियोजनही सुरू केले आहे.
निकम यांची भेट घेत असताना कार्यकर्त्यांनी जव्हार तालुक्यातील समस्यांचा पाढा वाचला व न्याय मिळेल या अपेक्षेने उपस्थितांनी आपली गाऱ्हाणी मांडली.जामसर येथील महावितरण कंपनीचा १३३ प्रकल्प अजूनही पूर्णत्वास झाला नाही त्यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विजेचा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ग्रामपंचायत स्तरावरती जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या पाणीपुरवठ्याची कामे युद्धपातळीवर होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे,यासाठी आराखडा तयार केला जाईल व जिल्ह्यातील प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा आपला प्रयत्न असेल.
त्याच प्रमाणे प्राथमिक शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करण्यात यावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जाही वाढविण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञानदानाचे कार्य काटेकोर करावे.प्रत्येक विद्यार्थ्यांला वाचता,लिहिता यावे यासाठी तीन महिन्याचा कार्यक्रम राबवणार असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले जाईल.शिक्षक बंधूंनाही त्यांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.पालघरमध्ये एकही आदिवासी मुले अशिक्षित राहता कामा नये असेही यावेळी त्यांनी ठासून सांगितले.
नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्षांनी जनतेच्या तक्रारी ऐकत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या भागाच्या विकासाकरिता अधिकाधिक योजना मागितले असून या भागाचा काया पालट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे निकम यांनी आश्वासित केले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, मा.पंचायत समिती सदस्य विनायक राऊत,उपशहरप्रमुख गजानन सहाणे,नगरसेविका हर्षदा तामोरे,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
