
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर (प्रतिनिधी): देगलूर तालुक्यातील चैनपूर या गावातील ही घटना मुरूम काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून चैनपुर येथील युवकांचा मृत्यू झाला. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली.
देगलूर तालुक्यातील बहुतांश गावात अनधिकृतपणे मुरम उत्खननाचा सपाटा सुरु आहे. क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन केलेल्या ठिकाणी मोठ – मोठे खड्डे पडले आहेत आणि त्या खड्यात भरमसाठ पाणी साचले आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी चैनपूर गावातील देविदास गंगाराम ईबितवार ( २० ) हा युवक शौचासाठी घराबाहेर पडून खदानीकडे गेला. खदानीच्या काठावर त्याच्या पायातील
चप्पल व कपडे दिसून आले. मात्र त्याचा कांही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संगम परगेवार यांनी येथील नगरपालिकेशी संपर्क साधून अग्निशामक दलाचे लक्ष्मण पाशेमवार, रवी सोनकांबळे, आऊलवार व इतर कर्मचाऱ्यांना पाचारण केले. सदर कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन प्रेत बाहेर काढले. देगलूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संगम परगेवार, बालाजी सकनुरे, शिंदे, व्ही. जी. मोटरगेकर यांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा नातेवाईकाच्या स्वाधीन केला. आता तरी प्रशासनाने अशा या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून ज्या ज्या ठिकाणी असे खड्डे खंदले आहेत त्या खड्ड्यांना एक तरी भरण भरून टाकून लेव्हल करणे किंवा त्यांना कठडे बांधले तर अशी घटना पुन्हा घडणार नाही.